करमाळा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदे भरण्यात यावी ; आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील

करमाळा प्रतिनिधी आलीम शेख
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात प्रथम श्रेणीचे ९ व द्वितीय श्रेणीचे ९ पशुवैद्यकीय दवाखाने असून यातील ७ पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या ५३ मंजूर पदांपैकी १७ पदे रिक्त आहेत या संदर्भात आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करत रिक्त असलेली पदे त्वरित भरण्याची मागणी सरकारकडे केली.
पदे रिक्त असल्या कारणाने दवाखान्यात पशुधनांवरील मोठ्या शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय सामुग्रीच्या अनुपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनावर खाजगी पशुवैद्यकांकडून उपचार करुन घ्यावे लागत आहे. शेतकऱ्यांना याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून, अपुऱ्या मनुष्यबळाअभावी पशुवैद्यकीय विभागाच्या अनेक योजना पशुपालकांपर्यंत पोहचत नसल्याने येथील पशुपालकांना योजनांपासून वंचित राहावे लागत. याचा सारासार विचार करून करमाळा तालुक्यातील पशुवैद्यकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे पाटलांनी सांगितले पशुपालकांना सेवा पुरविण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून रिक्त पदांचे कामकाज, अतिरिक्त कार्यभार तसेच बाह्यस्त्रोतांद्वारे मनुष्यबळउपलब्ध करून घेण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पशुधन विकास अधिकारी (गट-अ) संवर्गातील २९३ उमेदवारांची शासनास शिफारस प्राप्त झाली असून, सदर अधिकाऱ्यांना विहित प्रक्रियेने रुजु करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये करण्यात येणाऱ्या पदभरती मोहीमेअंतर्गत पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या अधिनस्त गट-क संवर्गाची ४४६ पदे भरण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. याद्वारे उपलब्ध उमेदवार, रिक्त पदांची संख्या व आवश्यकता विचारात घेवून रिक्त पदे भरण्यात येतील. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करमाळा तालुक्यातील कोणत्याही पशुधन मालकांची गैरसोय होणार नाही यांची हमी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांना दिली.



