विक्रमगडमधील धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्थामध्ये रंगला रानभाजी महोत्सव

(प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील संगमनगर मधील धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्था येथे धरतरी रानभाजी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये १० गावातील ३० महिलांनी सहभाग घेतला होता. एकूण ३८ प्रकारच्या भाज्यांची मांडणी केली होती.पावसाळा सुरू झाला की आजूबाजूला छोट्या गावांमध्ये डोंगरदरी कपाऱ्यामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या उगवू लागतात या रानभाज्या खूप औषधी असतात .

या रान भाज्या पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या एकदा उगवत असल्याने कमीत कमी वर्षातून तरी संधी साधून एकदा तरी खाव्यात खरंतर पालेभाज्या म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात परंतु या रानभाज्याचे महत्त्व आहे .आपण परिसरात फिरत असताना या बऱ्याचश्या भाज्या आपल्याला दिसत असतात. पण आपल्याला याची नावे माहीत नसतात . प्रत्यक्ष त्याचा औषधी उपयोग होतो, हेही माहीत नसते. बऱ्याच वेळा या भाज्या पहिलेल्या असतात पण ही भाजी कोणती आहे, ही भाजी आहे का ? हे मुळात कोणाला माहित नसते, ही भाजी कशी बनवतात. याविषयी माहिती मिळावी म्हणून रानभाज्या महोत्सव भरवण्यात आला.

सोबतच पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असणाऱ्या काही हिरव्या भाज्यांची माहिती सांगितली गेली. या रानभाज्या म्हणजे आंबटचुका, गुळवेल, घोळकाजी भुई आवळा आघाडा, मटाळू, कारटोल, वास्ता (बाबू), कपाळफोडी, खापर खुटी, गोखरू, चाकवत शेवगा, उडिद पाला ,खुरासणी पाला, माट भाजी, , तरोडा, तादळीची भाजी, पेंडर , कुरडू करटोले ,खापरा शेवगा चा पाला म्हणजे आणखी विविध भाज्या यात सहभागी करून घेतल्या होत्या.त्याचबरोबर या रानभाज्या महोत्सवाचे आकर्षण म्हणजे श्री. प्रकाश (बंधू) चौधरी यांनी वनौषधींची माहिती व विषारी व बिनविषारी हे प्रत्यक्ष सर्प दाखवून माहिती दिली.

तसेच आलेल्या सर्व महिलांची आरोग्य तपासणी करून औषधे देण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व महिलांना भेट वस्तू देऊन व सर्वांना राख्या बांधून कार्यक्रमाचा समारोप केला. या कार्यक्रमाला वनवासी कल्याण आश्रमाचे मुंबईतील कार्यकर्ते श्री.श्रीधर कोचरेकर काका, सौ. रेखाताई वाकणकर, सौ. रेखाताई बोराडे, डॉ.जामखेडकर , प्रबोधजी असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक धरतरी ग्रामोन्नती सेवा संस्थेचे मधुकर मालकरी , संजय पारधी , विजय मेघवाली , चंद्रकांत किंडरा , सागर दोडे व अन्य कार्यकार्ये आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .



