वसई जुचंद्र स्थानिक रिक्षा चालक-मालक संघटनेचे रास्ता रोको रिक्षा बंद आंदोलन स्थगित

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
वसई जुचंद्र स्थानिक रिक्षा चालक-मालक संघटनेने मंगळवार दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी नायगाव पूर्व येथील रस्त्यांची दयनीय खराब अवस्था झाल्यामुळे रिक्षा बंद रास्ता रोको आंदोलन पुकारण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.
या आंदोलनातील मागण्या या भागातील अधिकाऱ्यांनी मान्य केल्यामुळे या आंदोलनाला रिक्षा चालक-मालक संघटनेने 01 डिसेंबर 25 रोजी दुपारी स्थगिती दिली आहे.
या आंदोलनात नायगाव पूर्व ते नायगाव बाफाने,वामन ढाबा ते सेंटेक्स वर्ल्ड या परिसरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती आणि नवीन रस्त्यांची मागणी या आंदोलन निवेदनात करण्यात आली होती.
परंतु 01 डिसेंबर 25 रोजी दुपारी नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हजारे, जुचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, मिलिंद म्हात्रे, हेमाजी म्हात्रे, आणि महानगरपालिकेचे सहआयुक्त निलेश म्हात्रे, डेप्युटी इंजिनियर, विवेक चौधरी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनीयर या सर्वांच्या उपस्थितीत नायगाव पोलीस ठाण्यात मीटिंग आयोजित करण्यात आली होती.

या मीटिंगमध्ये महापालिकेचे सह आयुक्त यांनी मंगळवार दिनांक 02 डिसेंबर 25 या तारखेपर्यंत नायगाव ते बाफाने रस्त्यावरील सर्व खड्डे भरून 08 डिसेंबर पर्यंत या रस्त्यांचे डांबरीकरण करून येत्या 15 दिवसात वामन ढाबा ते सेंटेक्स वर्ल्ड या रस्त्याची वर्क ऑर्डर काढण्यात येईल अशी हमी देऊन रस्त्याचे काम चालू होईपर्यंत या रस्त्यावर लेव्हल प्लेट मारून रस्त्यावर रोज पाणी शिंपटले जाईल अशी लिखित हमी दिल्यावर जुचंद्र स्थानिक रिक्षा चालक-मालक संघटनेने मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी पुकारलेले रिक्षा बंद रास्ता रोको आंदोलन
स्थगित केले आहे.



