संगमनेरमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट ;विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

भोर प्रतिनिधी दत्तात्रय बांदल
भोर तालुक्यातील संगमनेर गावात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असून शुक्रवारी रात्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात आलेली दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडून रोख स्वरूपातील काही रक्कम लंपास केली आहे.
गेल्या वर्षभरापासून संगमनेर गावाला भुरट्या चोरांचा त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी सात ते आठ महिन्याच्या दरम्यान या मंदिरातील हीच दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडून ६,००० रुपयेची रोख रक्कम लंपास केली होती.
संगमनेर गावामध्ये गेल्या वर्षभरात अनेक चोऱ्या झाल्या आहेत. एका कुलूप बंद घरातून रात्रीच्या वेळी चोरट्यांनी ८ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. तर एका किराणा माल दुकानदाराच्या घरातून भर दिवसा ६०,००० रुपये एवढी रोख रक्कम चोरीस गेली होती. तसेच गावातून तांब्याचा बंब, कंपाउंडचे स्टील, स्मशानभूमीतील लोखंडाच्या प्लेटाची चोरी अशा बऱ्याच चोरीच्या घटना गेल्या वर्षभरात झाल्या आहेत.



