शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिवजयंती हर्षोल्हासात साजरी

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा म्हणजे शिवाजी महाराज. ज्यांच्या अंगी वीज लखलखते, तेज माथी चमकते असे छत्रपती शिवाजी महाराज. निश्चयाचा महामेरू! बहुत जनांसी आधारू! अखंड स्थितीचा निर्धारू! राजाधिराज यांची ३९३ वी जयंती शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये साजरी करण्यात आली.
तलवारी सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद सगळ्यांच्या मनगटात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठी रक्तातच होती. मातृभक्त, लोकपालक, उत्तम प्रशासक, स्वधर्मचिकित्सक, सामाजिक क्रांतिकारक, नारीरक्षक, पर्यावरण रक्षक,चिकित्सक व्यक्तिमत्व, जलतज्ञ उत्तम अभियंते आणि खऱ्या अर्थाने ते लोकराजे होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पाहत होते.

छत्रपती शिवरायांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून . सूरज दीपक बनकर यांची निवड करण्यात आली. ते महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक अभियंता या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली, कुणी पोवाडा सादर केला तर कुणी शिवगर्जना केली. विद्यार्थ्यांच्या या अप्रतिम सादरीकरणानंतर प्रशालेतील शिक्षक अभिषेक काटकर सर यांनी एका उत्तम व्याख्यात्याच्या भूमिकेत आपले मत मांडले त्यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र माने देशमुख सर यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने आपली भूमिका मांडली आणि कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन करिअर पर मार्गदर्शन केले.

अशा उत्तम व्यवस्थापनामध्ये आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. कीर्ती तानाजी साठे हिने केले तर आभार प्रदर्शन प्रशालेतील शिक्षक . रणजीत माने देशमुख सर यांनी केले.



