माणुसकीचा धर्म सर्वात मोठा! तांबवे गावात मंदिर-मस्जिदच्या सानिध्यात घुमला ‘हरिनाम’ आणि ‘एकात्मतेचा’ जयघोष

तांबवे (प्रतिनिधी): शकुर तांबोळी
आजच्या काळात जिथे धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जात आहेत, तिथे सोलापूर जिल्ह्यातील तांबवे (ता. माळशिरस) गावाने संपूर्ण देशासमोर सामाजिक एकोपा आणि सर्वधर्म समभावाचे एक अनोखे आणि प्रेरणादायी उदाहरण मांडले आहे. अवघ्या १५ ते २० फुटांच्या अंतरावर असलेल्या मंदिर आणि मस्जिदच्या साक्षिने, येथील हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ‘वारी’ आणि ‘भक्ती’ या पलीकडे जात माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
तांबवे गावात गेल्या १६ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक वर्षी सप्ताहातील एका दिवसाच्या कीर्तनाचे आणि महाप्रसादाचे संपूर्ण आयोजन गावातील मुस्लिम समाजाच्या वतीने केले जाते. यावर्षीही हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

यंदाच्या सप्ताहात पुणे-राजगुरुनगर येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. वैभव गावडे महाराज (झी मराठी फेम) यांचे कीर्तन संपन्न झाले. याप्रसंगी बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त कृषी अधिकारी फकृद्दिनअहमद शेख साहेब यांच्या हस्ते महाराजांचा शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. तर, प्राचार्य अबूबक्कर महमंद शेख साहेब यांनी या दिवशीच्या भव्य महाप्रसादाची संपूर्ण जबाबदारी स्वखर्चाने उचलून सामाजिक दातृत्वाचा आदर्श ठेवला.
’भेदभाव विसरू, माणुसकी जपू’ या भावनेने गावातील सर्व समाजघटकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या वातावरणात गावात केवळ भक्तीच नाही, तर आपुलकीची भावना अधिक दृढ झाली. तांबवेकरांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, “धर्माच्या भिंती फक्त जमिनीवर असतात, मनात नाही” हेच या गावाने सिद्ध केले आहे.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी युवा उद्योजक एजाज शेख (एहसान कृषी सेवा केंद्र), सतीश कोळेकर (माजी उपसरपंच), मुस्लिम धर्मगुरू जिलानी शेख, लतीफ शेख, कानिफ लवटे, मोनम शेख, असिफ अली शेख, दशरथ लवटे, सलीम खान, अस्लम मुलाणी, शब्बीर मुल्ला, जब्बार शेख, अब्दुल गणी शेख यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच तांबवे गावचे युवा वारकरी रत्न ह.भ.प. भूषण घाडगे महाराज यांचेही प्रवचन यावेळी संपन्न झाले.
”तांबवे गावाने निर्माण केलेला हा शांतता आणि एकतेचा आदर्श आजच्या समाजासाठी निश्चितच दिशादर्शक आहे.”



