वाचकांनी आवर्जुन वाचावे अशी लेखक महेश बजरंग कोळेकर यांनी मांडली पुस्तकांच्या नजरेतून पुस्तकांची व्यथा

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
अलीकडे पुस्तक तरी वाचतय कोण? गुगल वर सर्च केलं की एकापेक्षा एक नामवंत लेखकांच्या पुस्तकांची लगेच पीडीएफ मिळते. ऑनलाइन च्या जगात कागदावरील अक्षरे वाचतील तरी कोण? पण कधी तुम्ही पुस्तकांच्या नजरेतून विचार केलात का? एक सांगू ज्या प्रमाणे माणसाला भावना असतात अगदी त्याचप्रमाणे पुस्तकांना ही भावना असतात. पुस्तके बोलत नाहीत पण अन्याय आणि अत्याचारावर आवाज उठवायला शिकवतात. पुस्तके बोलायला,लिहायला शिकवतात आणि सर्वात महत्वाचं मन भरून जगायला शिकवतात. पुस्तकांची भाषा ही फक्त एका पुस्तकवेड्यालाच कळेल अशीच काहीशी असते.

पुस्तकातील प्रत्येक अक्षर म्हणजे एक आधार असतो पुढच्या ओळीला मागच्या ओळीचा आणि पुढच्या वाचक पिढीला मागच्या पुस्तकांचा. म्हणून तर आपण पुस्तकांना जपलं पाहिजे. पण आजकाल आपण पाहतोय ग्रंथालयात धूळ खात पडलेली पुस्तके आणि ग्रंथालय मध्येच मोबाईल मध्ये डोके खुपसून बसलेली मस्तके पाहायला मिळतात. पुस्तकांच्या नजरेतून पाहताना विचार करावयाचा झाल्यास त्या पुस्तकांचा रडण्याचा आवाज तुमच्या कानांवर पडेल. किती मोठी शोकांतिका आहे ना ही, खरच आज ही विचार करण्याची बाब झाली आहे.
संत तुकाराम महाराजांचा तो अभंग तुम्हाला आठवतो का ओ, “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने… आपल्या या पुस्तकांना आणि पुस्तकांतील प्रत्येक शब्दांना एक ऐतिहासिक वारसा आहे. असंख्य पुस्तके आणि असंख्य मस्तके यांचं सुंदर नात म्हणजे वाचक होय. आजच्या पिढीला पुस्तकांची मैत्री नको वाटतेय कारण त्यांना ऑनलाइन च्या विश्वातील अनेक ऑनलाइन मित्र आहेत. पण त्यांना एक कळत नाही की, त्यांची हीच ऑनलाइन मित्रमंडळी त्यांच्या उज्वल आयुष्याची वाट लावत आहे. आणि योग्य यशाचं, प्रगतीच, स्वप्नांचं वाट दाखवणार पुस्तक मात्र यास तरुण वाचक पिढीची वाट पाहत आहे. किती मोठी शोकांतिका आहे ना ही.

त्या प्रत्येक पुस्तकाला खंत वाटत असेल या गोष्टीची की, मी जन्मालाच का आलो एक पुस्तक म्हणून…! कितीतरी असंख्य विषयावरील पुस्तके आजही वाट बघत आहेत तुमच्या सर्वांची आतुरतेने. या एकविसाव्या शतकात पुन्हा एकदा पुस्तकक्रांती झालीच पाहिजे. रोज आपण सर्वांनी पुस्तकाचं एकतरी पान वाचलं पाहिजे. “मी सांगतो तुम्ही फक्त पुस्तके हातात घ्या तुमच्या हाताला त्या पुस्तकांचा सुगंध येईल आणि तोच सुगंध या जगात तुमची एक नवी ओळख निर्माण करून देईल.
” मन भरून जगावं माणसाने, रोज पुस्तक वाचावे माणसाने. लक्षात ठेवा जो माणूस पुस्तक वाचतो त्या माणसाला एक दिवस संपूर्ण जग वाचत आणि जो माणूस पुस्तक वाचत नाही त्याच्यासमोर संपूर्ण जग वेडा वेडा म्हणून नाचत. मग उत्तर तुमच्या हातात आहे वाचून द्यायचं की, नाचून द्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. माझं काय मी फक्त हे पुस्तकांच्या नजरेतून तुमच्याशी बोलतोय…!
लेखक-महेश बजरंग कोळेकर
संपर्क-९५७९२२८३४७
सोलापूर.



