भरदिवसा थरार! डहाणूतील न्यू लक्ष्मी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत लाखोंचा ऐवज लंपास

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
पालघर जिल्ह्यातील डहाणू शहर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या धक्कादायक घटनेने हादरले आहे. डहाणूच्या इराणी नगर परिसरातील प्रसिद्ध न्यू लक्ष्मी ज्वेलर्स या सराफ दुकानावर सोमवार दिनांक 20 जुलै रोजी भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे .
हातात बंदूक आणि इतर शस्त्रे घेऊन आलेल्या तीन अज्ञात दरोडेखोरांनी काही मिनिटांतच दुकानातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून पलायन केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुपारच्या सुमारास तिघेजण ग्राहकांच्या वेशात दुकानात आले. दुकानात प्रवेश करताच त्यांनी अचानक शस्त्रे बाहेर काढून कर्मचारी आणि उपस्थित ग्राहकांना धमकावले बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी दुकानातील सोन्याचे दागिने आणि मौल्यवान ऐवज बॅगेत भरला. संपूर्ण प्रकार काही मिनिटांत घडला आणि त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या धाडसी दरोड्यामुळे डहाणूतील सराफ व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा गजबजलेल्या भागात अशी घटना घडल्याने शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान दरोड्याची संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी संबंधित फुटेज ताब्यात घेतले आहेत . या फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच डहाणू पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि तांत्रिक तपास पथक घटनास्थळी पोहोचून तपास करत आहेत. परिसरातील नाकाबंदी करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या घटनेमुळे डहाणू शहरात मोठी खळबळ उडाली असून दरोडेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



