रेल्वेतील नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणारे तीन आरोपी कासा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या जाळ्यात अटक.

टाईम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क – उपसंपादक: विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत.
पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील एका तरुणीची एका तरुणा बरोबर फेसबुकवरून मैत्री झाल्यावर तुला रेल्वेत सरकारी नोकरी लावून देतो असं आमिष देऊन या तरुणीसह पालघर जिल्ह्यातील अन्य तीन जणांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या पथकाने तीन आरोपींना शुक्रवारी जेरबंद केले आहे.
डहाणू तालुक्यातील योगिता महादू चौधरी या तरुणीने दिलेल्या फिर्यादीनंतर एका आरोपीला नाशिकमधून तर दोघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या पथकाला शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी यश आले आहे.
मुख्य आरोपी दीपक किशोर दर्शन राहणार बोईसर हा फेसबुकच्या माध्यमातून तरुण-तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री करत असे. त्यानंतर काही दिवसात आरोपी त्याच्या इतर साथीदारांसह फेसबुकवर मैत्री केलेल्या तरुण-तरुणींना तुम्हाला रेल्वे विभागात नोकरी लावून देतो असे आमिष देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असे.

योगिता महादू चौधरी या तरुणीने आपल्याला नोकरी लावून देण्यासाठी आरोपीला तब्बल 4 लाख रुपये दिले होते.तर योगिता चौधरी हिच्यासह पालघरमधील आणखी तिघांनी या आरोपींना प्रत्येकी 4 लाख रुपये दिल्याची साक्ष कासा पोलीस ठाण्यात दिली आहे.
आरोपीकडून वारंवार उडवा उडवीची मिळणारी उत्तरं आणि त्यानंतर काही दिवसांनी आरोपीचा फोन बंद झाल्याने योगिता चौधरी हिने कासा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ यांनी आरोपीला जेरबंद करण्याचे आदेश जारी केली होते. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून त्वरित
कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप नागरे यांनी सापळा रचून मुख्य आरोपी दीपक कीशोर दर्शन याला नाशिक मधून तर विवेक कुमार कैलास चंद्र आणि राहुल प्यारेलाल पाल या दोघांना उत्तर प्रदेशातून सापळा रचून अटक केली आहे. या प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४०६, ३४ अशा कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपींनी नोकरीचे आमिष देऊन तरुण-तरुणींची फसवणूक केली असल्यास किंवा कोणाची फसवणूक झाली असेल तर पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क साधावा असे आवाहन कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्याकडून जनतेला करण्यात आले आहे.



