जुन्या पिढीच्या तुलनेत नव्या पिढीमध्ये नम्रते चा अभाव : प्रा. डी. डी. पाटील यांची खंत

प्रा.विश्वनाथ –पाटील (प्रतिनिधी)
कोडोली ता. पन्हाळा जि.कोल्हापूर
, ” आमची जुनी पिढी गुरुजनांना खाली वाकून नमस्कार करते. आमचेही जुने विद्यार्थी आम्ही रस्त्यात जरी भेटलो तरी ते आम्हाला खाली वाकून नमस्कार करतात. हल्लीचे विद्यार्थी मात्र गुरुजनां पुढे झुकत नाहीत. त्यांना गुरुजनांना नमस्कार करायची लाज वाटते,” अशी खंत प्रा. डी. डी. पाटील यांनी त्यांच्या षष्ट्यब्दि पूर्ती समारंभ सेवा पूर्ती समारंभात व्यक्त केली.
कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून ग्रंथपाल पदावरून 36 वर्षांच्या सेवेतून ते निवृत्त झाले. त्यानिमित्ताने श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ आणि महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा व पत्नी सौ. वृषाली यांचा संस्थेचे सेक्रेटरी डॉ. जयंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील होते.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रारंभी डॉ. जयंत पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण - 2020 या विषयावर घेण्यात आलेल्या भित्तिपत्रक स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पाहुण्यांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून सत्कार मूर्तीं च्या कार्याविषयी भावनां ना वाट करून देताना डॉ. जयंत पाटील म्हणाले, " माझे आजोबा माजी आमदार कै. यशवंत एकनाथ पाटील ( दादा) यांच्याशी महाविद्यालयाच्या प्रगती संदर्भात प्रा. डी. डी. पाटील चर्चा करायला आमच्या वाड्यात यायचे. त्यावेळी मी लहान होतो. तरीही त्यांची महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल ची तळमळ मी कळत्या वयापासून अनुभवतो आहे. ते नियत वयोमानानुसार महाविद्यालयाच्या सेवेतून जरी निवृत्त झाले असले तरी आम्ही इथुन पुढे नेहमी संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांचा सल्ला घेत राहू. "
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील म्हणाले,” प्रा. डी. डी. पाटील यांच्यावर सोपविलेल्या सर्व जबाबदार्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा धर्म त्यांनी पाळला. फळाची अपेक्षा न बाळगता काम करायचे एव्हढेच ध्येय त्यांच्यापुढे असायचे. त्यांनी फक्त ग्रंथालय सांभाळले असे नसून महाविद्यालयाच्या सर्व उपक्रमांत ते हिरीरीने सहभागी होत असत. “
याप्रसंगी शाहूवाडी येथील सेवानिवृत्त गटशिक्षण अधिकारी नंदकुमार शेळके, येथील यशवंत इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य मंदार पसरनीकर, प्रा. संजय जाधव, सेवक कृष्णात माने यांच्यासह प्रियांका मोहिते, राधिका निकम यांनी सत्कारमूर्ती चा गुणगौरव करणारी भाषणे केली. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पुंडलिक पाटील, पेठवडगाव चेवयोवृद्ध संगीतकार व्ही. डी. लाळगे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थिनी – शिक्षिका समृद्धी जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रगती पाटील यांनी आभार मानले. अनुष्का खंबाळे यांनी सूत्रसंचलन केले. महाविद्यालयाच्या सृजनशीलता व व्यक्तिमत्त्व विकास विभाग आणि गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवा चे औचीत्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापिका श्रीमती गुलनाज मुजावर, प्रा. संजय जाधव, प्रा. ए. के. बुरटूकने, कार्यालयीन अधीक्षक एस. के. पाटील, वरीष्ठ लिपिक अनिल इंदुलकर, सेवक तानाजी मोहिते आदींनी परिश्रम घेतले.



