गणेशगावमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन.हिंदू-मुस्लिम समाज गावात घडवतात एकीचे दर्शन.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
गणेशगांव (नूरजहाँ शेख —गणेशगाव)
भारतीय संस्कृती शहरांमध्ये लोप पावताना दिसत असताना खेड्या पाड्यातून ती अजून हि जोपासली जाते याचे जीवंत उदाहरण म्हणजे माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील छोटेसे गाव म्हणजे गणेशगाव.या गावात सर्व सण,उत्सव,ईद, महापुरुषांची जयंती,पुण्यतिथी सर्व धर्मीयातील नागरिक एकत्र मिळून मिसळून साजरी करतात.रमजान ईद फक्त मुस्लिम समाज साजरी करतात असे नाही तर हिंदू धर्मीय हि ईद साजरी करण्यात सहभागी असतो.दिवसभर अन्न पाणी त्यागून रोजे ही धरतात.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात केळी,पपई,पेरु,डाळींब, कलिंगड, द्राक्षे काकडी ही फळे आहेत ते इफ्तार पार्टीच्या वेळी मस्जिदमध्ये व मुस्लिम बांधवांच्या घरी विनामुल्य पोहोचवली जातात.व ज्यांच्या शेतात फळ वर्गीय पिके नाहीत ते शेतकरी मस्जिदमध्ये खजूर वाटप करतात.रोजे असणाऱ्यांना जेवणांची इफ्तारीची तरतूद ही हिंदू बांधव मोठ्या उत्साहाने करतात.शिरखुर्मा तयार करण्यासाठी लागणारे दूध हे गावातील मोरे कुटुंब विनामूल्य मुस्लिम बांधवाना वाटप करतात आणि ईदच्या उत्सवात सहभागी होतात.मोहरमचे शरबताचा आस्वाद घ्यायला सम्पूर्ण गाव एकत्र येते.गावात स्वयंभू गणेशाचे मंदिर आहे.गणेश जयंतीला मुस्लिम बांधव भाविकांसाठी पाण्याची जेवणाची सोय करण्यात तल्लीन होतात वाढपी बनून गावाकऱ्यांना भाविकांना कोणी न जेवता मंदिरा बाहेर जाऊ नये याची दक्षता घेतात.
नवरात्रीच्या वेळी मुस्लिम बांधव ज्योत आणण्यासाठी उत्साहाहाने तुळजापूरला जातात.महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीला सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन साजरी करतात .राजकीय गटातील भांडण तंटे , आपसातील मतभेद वैर विसरून एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होतात.सर्वच धर्म मानवजातीच्या कल्याणासाठी आहेत.कोणताच धर्म सांगत नाही की मानवा कर तु कुकर्म.खरा तो एकच धर्म आहे तो मानवतेचा आहे.एकमेकाच्या धार्मिक भावनांचा आदर करून माणुसकीला प्रथम स्थान दिले जाणे म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता जोपासने.गणेशगांव मधील गावाकऱ्यांचा आदर्श सर्व गाव आणि शहरांनी घ्यावा म्हणजे देशातील धर्मभेदाचे खुळ नष्ट होईल आणि वारंवार मुंडके वर काढून विधवंश घडवणारा दंगल नावचा हैवान देशात फिरकणार सुद्धा नाही.गणेशगवमधील जनतेचा आदर्श सर्वांनी घेतला तर आपला देश सुखी समाधानी संम्पन्न होईल आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट होईल.



