पालघर घोलवीरा येथील 28 वर्षीय सोनाली धामोडा या तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू.

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर येथील घोलवीरा येथे राहणाऱ्या (28) वर्षीय तरुणीला मध्यरात्रीनंतर विषारी सापाने चावल्यानंतर 7 तासांमध्ये तिचा गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी मृत्यू झाला.या प्रकरणात तिला आवश्यक औषध उपचार दिल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक यांचे म्हणणे असले तरी कामावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी हलगर्जीपणा केल्याचे आरोप नातेवाईकांनी केले आहेत.
घोलवीरा येथे राहणारी सोनाली विष्णू धामोडा (28) या घरी झोपेत असताना त्यांना घरातून विषारी मण्यार साप बाहेर जाताना दिसला. या सापाने आपल्याला दंश केल्याची शक्यता वाटल्याने या तरुणीला तिच्या नातेवाईकांनी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात रात्री दीड वाजल्याचा सुमारास दाखल केले. तिला सर्पदंशाचे प्रथम कोणतीही लक्षणं दिसली नव्हती असे रुग्णालयाचे म्हणणे आहे.
3 वाजताच्या सुमारास तिला उलटी झाल्याने सर्प दंशाची लक्षण दिसल्यानंतर तिच्यावर आवश्यक उपचार सुरू करण्यात आले. सकाळी 7 वाजल्याच्या सुमारास तिची प्रकृती खालावल्याने तिला पालघर जिल्ह्यातील डहाणू धुंदलवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात नेत असताना रस्त्यात साडेआठ वाजल्याचा सुमारास तिचा मृत्यू झाला.
विषारी सापाचा सर्पदंश झाल्याचे खात्रीपूर्वक नातेवाईकांनी न सांगितल्याने तिच्यावर नियमित उपचार सुरू करण्यात आले होते. तसेच या तरुणीला या दोन महिन्यापासून क्षय आजाराने ग्रासल्याने सहव्याधीमुळे तिच्यावरील उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही असे पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीप्ती गायकवाड यांनी सांगितले. या प्रकरणात शल्य चिकित्सक कार्यालयाकडून या मृत्यूची चौकशी सुरु करण्यात आली असून कामामध्ये हलगर्जीपणा आढळल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नव्हे तर जिल्हा मुख्यालयाच्या शहरात सर्पदंश झालेल्या तरुणीचा मृत्यू झाल्यामुळे वैद्यकीय सुसज्जतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा आरोप
सर्पदंश झालेल्या तरुणीला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर सुमारे अर्धा तास तिच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. कामावर असणाऱ्या परिचारिका त्यावेळी बराच वेळ मोबाईलवर संभाषण करण्यात व्यस्त होत्या असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्याचबरोबर साडेतीन-चार वाजल्यापासून या तरुणीची प्रकृती खालावली असताना तिला अन्य ठिकाणी उपचारासाठी हलवण्याची वर्दी सकाळी सहा वाजता दिल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. तिला डहाणू येथे उपचारासाठी हलवताना पुरेशा प्रमाणात उपकरणे व प्राणवायू पुरविला गेला नसल्याचे देखील नातेवाईकांचे म्हणणे असून या बाबत पालघर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे.



