अल्लाहच्या मर्जीसाठी रोजा

रमजानुल मुबारक क्रमश – २
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
रमजान महिन्याचे रोजे फर्ज (अनिवार्य) असल्यामुळे त्यास खूप महत्व आहे.रोजा ही एक प्रकारची प्रार्थना (इबादत) आहे.सर्व प्रार्थना या अल्लाह साठीच आहेत.मात्र रोजाचा मोबदला साक्षात ईश्वरच देणार असल्याने त्याला विशेष महत्व आहे.कारण कुरआन शरीफ मध्ये अल्लाहने म्हटले आहे कि “रोजा मेरे लिए है और मै ही इसका अज्र दूंगा.” या वरुन रोजाचे महत्व लक्षात येते.
रोजेदारासाठी अल्लाहने विशेष प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. जसे स्वर्गाच्या आठ प्रवेशद्वारांपैकी एक द्वार बाबुल रय्यान हे फक्त रोजेदारांसाठीच निर्मिले आहे.रोजेदारांसाठी सृष्टीतील सर्व सजीव दुआ करतात.समुद्रातील मासे सुध्दा दुआ करतात.रोजेदाराच्या मुखाची दुर्गंधी देखील कस्तुरीपेक्षा अधिक खुशबुदार (सुवासिक) असते.
रमजान महिन्याचे रोजे अनिवार्य करण्यामागे अल्लाह तआलाचा हेतू खूप उदात्त आहे. प्रत्येकाच्या अंगी सर्व सगुण निर्माण व्हावेत, वाईट गुणांचे क्षालन व्हावे,जे जे चांगले आहे त्याची जोपासना व्हावी, मानवाला सर्व प्रकारच्या शारीरिक,मानसिक, नैतिक,चारित्र्यात्मक बाबी उपलब्ध व्हाव्यात व यातून एक सुशील चारित्र्यवान समाज निर्माण व्हावा, प्रत्येकाच्या जीवनात सृजनात्मक, भावनाशील,सदाचारी, उच्च प्रतिच्या गुणांनी संपन्न वृत्ती निर्माण होऊन सर्व गुणसंपन्न, सुदृढ समाज निर्मिती अस्तित्वात यावी. यासाठी रोजे किंवा उपवासाची निर्मिती झाली आहे.फक्त उपाशी राहणे व शरीराचे संतुलन निर्माण करणे एवढाच रोजाचा हेतू नाही तर दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत विवेकाचा उपयोग करून आपले जीवन संपन्न कसे जगता येईल यासाठी आवश्यक सद्गुणांची जोपासना आपल्या अंगी व्हावी व त्याप्रमाणे आपले वर्तन असावे यासाठी रोजाची आदर्श आचारसंहिता निर्माण केली गेली आहे.
रोजेदाराकडून कुठल्याही प्रकारचे वाईट वर्तन अपेक्षित नाही.महिनाभर उपवास करुन चांगल्या सवयी अंगी बाणल्या जातात व त्यापुढे सुरु राहिल्याने एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण होते.रोजे फक्त मुस्लीमांसाठी नाही. चांगल्या सवयींची अभिलाषा बाळगणारी कोणतीही व्यक्ति रोजे धरू शकते. महिनाभराचे पूर्ण रोजे करणारे अनेक तर शेवटच्या टप्प्यात काही मोठे रोजे धरणारे शेकडो हिंदू बांधव आपल्या समाजात आहेत.परमेश्वराला जातीधर्मापेक्षा मानवता धर्म वाढीस लावणारे लोक अधिक प्रिय आहेत.रोजा हा मानवता धर्म ( इन्सानियत) वाढीस लावणारा प्रकार आहे.
(क्रमशः2)
सलीमखान पठाण
9226408082.



