मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा मतदार संघातील रखडलेली कामे पूर्ण करण्यास माजी आमदार नारायण पाटील सक्षम

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माजी आमदार नारायण पाटील करमाळा मतदार संघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी समर्थ असल्याची खात्री आज पाटील गटाकडून देण्यात आली. राज्यातील नाट्यमय घडामोडीचे पडसाद सर्वत्र उमटले असून करमाळा मतदार संघाचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांना अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्याने अधिक बळ मिळणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. यामध्ये तालूक्यातील पाटील व बागल गटाची गोची होणार असल्याचा उल्लेख करण्यात आला.
यावरुन आज पाटील गटाने तातडीने आपली भूमिका स्पष्ट केली. या वृत्ताचे खंडन करताना पाटील गटाचे प्रवक्ते सूनिल तळेकल यांनी सांगितले की माजी आमदार नारायण पाटील हे सुरुवाती पासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. दरम्यानच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्या मागण्या मान्य करत अनेक विकासकामांना मंजूरी दिली.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना, तालूक्यातील स्थगिती असलेले रस्ते व पुलाची कामे, नियोजीत रिटेवाडी उपसा सिंचन योजना, कुकडी, दहिगाव उपसा आदि अनेक कामातुन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्री हे माजी आमदार नारायण पाटील यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभे आहेत हे प्रत्यक्षात जनतेलाही दिसून आले आहे. याशिवाय सत्तेत सहभागी असलेले भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचीही भक्कम साथ माजी आमदार नारायण पाटील यांना मिळत आहे.
यामुळे अजितदादा पवार यांच्या उपमुख्यमंत्री होण्याचे पाटील गट स्वागत करत असून यामुळे आमदार संजयमामा शिंदे यांचे बळ वाढून पाटील गटाची गोची झाली या वृत्ताचे खंडण करत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होतेच शिवाय त्यांच्याकडे अर्थखातेही होते. मतदार संघास निधी हा पाठपुरावा करुन आणावा लागतो. आमदार संजयमामा शिंदे यांना त्यावेळीही निधी आणता आला नाही. यामुळे मग आताच्या घडीलाही विद्यमान आमदार खास काही करुन दाखवतील असा प्रकार नाही.
करमाळा मतदार संघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या मागेही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री खंबीरपणे उभे असताना पाटील गटाला काळजी करावयाचे कारण नाही. आजही स्वतः पदावर नसताना माजी आमदार नारायण पाटील हे दर आठवड्याला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सतत संपर्कात असून करमाळा मतदार संघातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा चालू आहे व राहील असे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी ठामपणे सांगितले.



