पोंधवडी चारी चे काम माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्यामुळेच मार्गी लागले पाटील गटाचा दावा

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
पोंधवडी चारीचे काम माजी आमदार नारायण पाटील यांच्यामुळेच मार्गी लागले, असा दावा आज पाटील गटाकडून करण्यात आला. कुकडी प्रकल्प डावा कालवा अंतर्गत पोंधवडी चारीच्या कामास 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून उर्वरित कामे मार्गी लावता येणार आहेत. या कामासाठी आपण प्रयत्न केले असा दावा आमदार संजयमामा शिंदे यांनी केला होता. यावर पाटील गटाकडून प्रवक्ते सूनील तळेकर यांनी या कामाचे श्रेय माजी आमदार नारायण पाटील यांना जात असल्याचे सांगितले.
यावेळी तळेकर यांनी सांगितले की सन 2009 पासुन हा प्रश्न प्रलंबित होता. परंतू सन 2014 मध्ये तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालूक्यास अल्प प्रमाणात मिळणारे कुकडीचे पाणी व अनेक वर्षांपासून रखडलेली कुकडीची अपुर्ण कामे याबाबत अधिवेशन काळात सभागृहात तारांकीत प्रश्न उपस्थित केले. सन 2014 ते 2019 दरम्यान एकुण सतरा आवर्तने कुकडी द्वारे करमाळा तालूक्यास मिळवून दिली. कुंभेज तलाव हा कुकडी चारीचा टेल भाग असून या तलावातही कुकडीचे पाणी आणले.कुकडी प्रकल्प निर्मितीपासून कुकडीचे भुभाडे करमाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळाले नव्हते.
पण 2014 नंतर माजी आमदार नारायण पाटील यांच्यामुळेच शेतकऱ्याला जमीनीचा मोबदला व भुभाडे मिळाले. कुकडी डावा कालवा अंतर्गत पोंधवडी चारीच्या कामासाठी निधीची मागणी केली असता यापूर्वीची प्रशासकीय मंजूरी व त्यातील समाविष्ट खर्च रक्कम पुर्ण झाल्याने सुधारित प्रशासकीय मंजूरी घेणे क्रमप्राप्त होते. करमाळा तालूका हा कुकडी प्रकल्पात शेवटचा टेल कडील तालूका असल्याने एकट्या करमाळा तालुक्यातील कामांसाठी निधी मिळत नव्हता.
यामुळे माजी आमदार नारायण पाटील व तत्कालीन मंत्री प्रा राम शिंदे यांनी कुकडीच्या सुप्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर कुकडीच्या कामासाठी 3999 कोटी रुपयांची सुप्रमा मंजूर केली गेली. यामुळेच आता पोंधवडी चारीसाठी 9 कोटी मंजुर करताना तांत्रिक अडचण आली नाही. यामुळे माजी आमदार नारायण पाटील यांच्यामुळेच पोंधवडी चारीचे काम मार्गी लागले आहे. विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी दहिगाव उपसाची सुप्रमा आपण मंजूर करुन आणली याचा मोठा गाजावाजा केला.
ढोल बडवले. पण या कामासाठी निधी मात्र आणला नाही.केवळ आयत्या पीठावर रेघोट्या मारत पाठीमागील काळातील प्रस्तावित व मंजूर कामांचे श्रेय घ्यायचे हा एककलमी कार्यक्रम 2019 पासुन विद्यमान आमदार राबवत आहेत. पोंधवडी चारी हा यातीलच एक भाग असून जनता सर्व गोष्टी जाणून आहे. दहिगावच्या सुप्रमाचे ढोल सादळले असतील तर ते नव्याने बडवावेत आणि निधी मंजूर करुन उर्वरित कामे पूर्ण करुन दाखवावीत.
पोंधवडी चारी बाबतचा पाठपुरावा, कुकडीची 3999 कोटी रुपयांची सुप्रमा,कुकडी चारी अस्तरीकरण याबाबतचे विधिमंडळ कामकाजात नोंद असलेले कागदोपत्री पुरावे माजी आमदार नारायण पाटील यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत, संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यास माजी आमदार नारायण पाटील तयार आहेत, विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी उपस्थित राहण्याची हिंमत दाखवावी, असे खुले आव्हान प्रवक्ते सुनील तळेकर यांनी पाटील गटाकडून आ. शिंदे यांना दिले.



