सोलापुरात जमावबंदी आणि संचारबंदी लागू

(प्रतिनिधी रतन डोळे ,टाईम्स 9 मराठी )
सोलापूर महापालिकेकडून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची वादग्रस्त चिमणी पाडण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे कारखान्याच्या चारही बाजूने दोन किलोमीटर अंतरावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. कारखान्याच्या परिसरात कर्फ्यू लावण्यात आला असून कोणत्याही जमावाला या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा सचिव एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते हातात माकपचे लाल झेंडे घेऊन गोदूताई परुळेकर वसाहतीकडून कारखान्याकडे निघाले होते.
दरम्यान शेख यांनी माध्यमांशी बोलताना, सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जर पाडली तर सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न गंभीर होणार आहे. याला आम्ही विरोध करत आहोत. कालपासून पोलीस आयुक्तांनी या भागात जमावबंदी आदेश लागू केलेला आहे तो आम्ही भंग करत आहोत, असे जर मोठे उद्योग बंद पडले तर निश्चितच बेकारी वाढेल त्यामुळे या चिमणी पाडकामला आमचा विरोध असेल, अशी भूमिका शेख यांनी मांडली.
दरम्यान सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला विरोध होत आहे. आज भल्या पहाटे पोलीस प्रशासन व महानगरपालिका यंत्रणेने कारखान्यात घुसल्याची माहिती मिळत आहे. राजकारण करून सिद्धेश्वर साखर कारखाना बंद पाडून शेतकरी कामगारांना उद्धवस्त करू करण्याऱ्या महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ माकप अग्रेसर असून चिमणी ही विमान सेवेत अडथळा ठरते, असा जावईशोध इथल्या तज्ज्ञांनी लावला, असा आरोप करत या आधी सोलापूरमध्ये किंगफिशर कंपनी मार्फत विमान सेवा उपलब्ध होती.
नियमितपणे चालणारी सेवा का बंद पडली? हा यक्ष प्रश्न आहे. आजही मंत्री, लोकप्रतिनिधी याची विमाने उतरत असताना चिमणी तेव्हा चिमणी अडसर वाटत नाही, हा गौडबंगाल आहे. चिमणी पाडण्याची भूमिका ही शेतकरी कामगारांच्या विरोधात असून जमावबंदी आदेशाचा भंग करून शेतकरी कामगारांसाठी माकप रस्त्यावर उतरला आहे.अशी भूमिका माकपचे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांनी व्यक्त केली.

गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी महापालिका प्रशासन अग्रेसर राहिले असून काल दुपारी पासून कारखान्याच्या परिसरात जमावबंदी व मध्यरात्री संचारबंदी लागू करून पहाटे चार च्या सुमारास हजारोंच्या संख्येने पोलीस फौजफाटा तैनात करून तणावपूर्ण वातावरण निर्माण केले. अशा वेळी शेतकरी कामगारांच्या समर्थनार्थ व महापालिका प्रशासनाच्या आठमुठी भूमिकेच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेकडो कार्यकर्त्यांना साखर कारखान्या कडे आगेकूच करताना पोलिसांनी माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख व कॉ.युसूफ शेख मेजर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
माकप चे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक पार पडली. त्यानंतर माकपचे जिल्हा सचिव अँड.एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार रात्रभर कार्यकर्ते जागरण करून सकाळी पोलिसांना चकवा देत लाल झेंडे घेऊन पालिका व पोलिस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत मोर्चा काढला.यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. रस्त्यावर ठिय्या मांडताच पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.



