वारकऱ्यांवर वार करणारे हात पोलिसांचे पण या घटनेवर पडदा टाकणारा मेंदू कुणाचा?– ऍड.शीतल चव्हाण.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
वारकरी म्हणजे टाळ बडवत, हरिनामाचा जप करीत
रिकामटेकड्यांचा कळप नव्हे. माणसानेच निर्माण केलेल्या माणसा-माणसातील भेदांना भक्तीच्या माध्यमातून आणि अभंगांच्या साहाय्याने भंग करु पाहणारा विद्रोही प्रवाह म्हणजे वारकरी सांप्रदाय होय.
भारतातल्या वर्ण-जातीच्या विषवल्ली उपटून टाकण्यासाठी मध्ययुगात भक्ती चळवळ उदयास आली.
‘जाती न पुछो साधू की पुछो उसका ग्यान, किमत करो तलवार की पडी रहने दो म्यान’ अशा शब्दांत संत कबीराने जातीव्यवस्थेवर आपल्या दोह्यांच्या माध्यमातून घाव घातले. महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायाच्या रुपाने भक्ती चळवळीने पकड घेतली. नामदेव, ज्ञानोबा, तुकाराम, चोखामेळा, गोरोबा काका, जनाबाई, मुक्ताई अशा संतमहंतांनी या चळवळीला बळकट केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील कष्ट करणाऱ्या, शेतात राबून जगाला पोसणाऱ्या सर्वसामान्यांनी वारकरी सांप्रदायाची मानवतावादी चळवळ जपली, वृद्धिंगत केली.
विषमतावादी परंपरेला नाकाराणाऱ्या प्रवाहांना ज्याप्रमाणे अडथळे निर्माण करुन अडवण्याचा, संपवण्याचा प्रयत्न केला गेला तसाच प्रयत्न वारकरी चळवळीच्या बाबतीतही झाला. पण या चळवळीच्या भक्तीचा झरा कधीही आटला नाही. ज्ञानोबाला जीवंत समाधी घेण्यास भाग पाडले गेले. तुकोबांची गाथा इंद्रायणीत बुडवून, त्यांची हत्या करुन त्यांच्या शरिराच्या तुकड्यांनाही इंद्रायणीतच सोडण्यात आले. हे पाप झाकण्यासाठी तुकोबा सदेह वैकुंठाला गेल्याच्या भाकडकथाही पसरवण्यात आल्या. पण इंद्रायणीत बुडवलेली तुकोबांची गाथा वारकऱ्यांनी हृदयात जपली.
ही गाथा मौखिक परंपरेने पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोंचवली. अक्षरज्ञान नसलेल्या माणसांना तुकोबांचे मुखोद्गत असलेले अभंग जीवनाची दिशा देत राहिले. दु:ख, हार, अपमानात विठोबाच्या भक्तीने त्यांना बळ दिले. इंद्रायणीत एक गाथा बुडाली असेल पण तुकोबांच्या हृदयात जपलेल्या गाथेने मातीत राबणाऱ्या माणसांच्या अनंत कथा घडवल्या. जनमाणसाने हृदयात जपलेली तुकोबांची गाथा तमाम मानवतावाद्यांची प्रेरणा बनून अखंडितपणे वाहत राहिली आहे.
जग बदलले, आधुनिकीकरण झाले, भांडवलशाही आली, जग म्हणजे एक वैश्विक खेडं वाटावं असं वातावरण उदारीकरणाच्या युगात आले पण शेकडो वर्षांपूर्वी निर्माण झालेली वारकऱ्यांची वारी ऊन, पाऊस, वारा कशाचीही तमा न बाळगता बदललेल्या जगातही ‘ग्यानबा-तुकाराम’चा गजर करीत सुरुच आहे. ती कधीही थांबली नाही. थांबणार नाही.
वारकरी सांप्रदायाच्या उदयानंतर अनेक नव्या विचारधारा देशात आल्या. पण या विचारधारांनाही वारकरी चळवळीने आपलेसे केले. कार्ल मार्क्ससारख्या नास्तिक तत्ववेत्याचे साम्यवादी तत्वज्ञान जगभर पसरले. हा विचार भारतातही आला. मार्क्सच्या कम्युनिस्ट विचारांचा लाल बावटा महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटलासारख्या वारकऱ्यांनी उचलला. पण वारकरी सांप्रदायाची भगवी पताका नाकारुन नाही. एका खांद्यावर लाल बावटा आणि दुसऱ्या खांद्यावर वारकरी सांप्रदायाची भगवी पताका घेवून क्रांतिसिंह नाना पाटील आपल्या मातीसाठी आणि या मातीत राबणाऱ्या माणसांसाठी लढले. वारकरी सांप्रदायाने अशाप्रकारे परकीय विचारधारांनाही सामावून घेतले. कारण, ‘रंजल्या-गांजल्यांना’ आपलं म्हणणाऱ्या तुकोब्बांचे संस्कार या चळवळीवर आहेत. मग रंजल्या-गांजल्यांचे, सर्वहारांचे राज्य आणू पाहणारी कम्युनिस्ट विचारधारा त्यांना परकी कशी वाटेल?
वारकरी चळवळीला निसर्गाचे प्रकोप, परकीय विचारधारा यापैकी कशाचाही अडसर झाला नाही. पण वारकरी चळवळीला याच देशात विषासारखी पसरलेली मनुवादी परंपरा आणि या परंपरेतील मंबाजी सारख्या सैतानांनी कायमच अडसर आणण्याचा प्रयत्न केला.
‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी वाहावा भार माथी’ असे ठणकावत वर्णश्रेष्ठत्वाचा दंभ उतरवणाऱ्या तुकोबांना नामोहरम करु पाहणारे मंबाजी प्रत्येक काळात वारकऱ्यांच्या आडवे आले आहेत.
वारकरी एकमेकांना ‘माऊली’ म्हणतात. कसलाही भेदभाव न पाळता एकमेकांच्या पाया पडतात. वारकरी हे मातृहृदयी असतात. ‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजराला नाद देणारे टाळ, मृदंग ही वारीतील प्रमुख साधने असतात. पण अशा या वारीत भिडे नावाचा आधुनिक मंबाजी तलवारी घेवून शिरतो. ज्याच्या सडक्या मेंदूने कायम द्वेषाची आग ओकली आहे, तो वारकऱ्यांच्या वारीत आपले धारकरी घुसवून वारीला कलुषित करु पाहतो. तरीही वारकऱ्यांची वारी आपल्या मानवतावादी, समतावादी पंरपरेला सोडत नाही आणि मंबाजींच्या धारकऱ्यांनी विचलित होत नाही.
वारीत साप सोडला जाणार असल्याच्या आणि चेंगराचेंगरी घडवून आणली जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या जातात. या वावड्यांचे निमित्त करुन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रपंत पंढरपूरला विठ्ठलपुजेला यायचे टाळतात. पण पिढ्यानपिढ्या अपप्रवृत्तीला आणि विषमतेला तुडवणारे वारकरी या वावड्यांनाही तुडवत चालत राहतात. बाया-माणसांनी धरलेल्या फुगड्या अशा अफवांना धुळीत मिसळवतात आणि वारकरी मंडळी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीतही आपला भक्तीचा उत्सव तेवढ्याच आनंदाने पार पाडतात.
महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या वारीकडे सगळे जग कुतूहलाने बघते. एवढी शिस्तबद्धता या वारीत पहायला मिळते. यंदा आळंदीत ज्ञानोबाच्या दर्शनाला जमलेल्या वारकऱ्यांवर पोलिसांनी ‘लाठीचार्ज’ केला. एवढ्या वर्षात आजवर हे कधीही घडले नव्हते.
संघ-भाजप परिवाराने कायम समतावादी परंपरेला नाकारले, दुय्यम लेखले आणि या परंपरेतील महामानवांची हेटाळणी केली.
या परिवारातील भगतसिंग कोश्यारी नावाच्या राज्यापाल पदावर बसलेल्या आधुनिक मंबाजीने छ. शिवराय, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांचा अवमान करणारी वक्तव्ये केली. सद्ध्या या परिवाराचे मुकुटमणी असलेल्या नरेंद्र मोदींची तुलना थेट शिवराय आणि बाबासाहेब यांच्याशी करणारी पुस्तकेही प्रकाशित केली गेली. अशातच देवेंद्रपंत गृहमंत्री असतानाच्या काळातच वारकऱ्यांवर पोलिसांकरवी लाठी हल्ला करणारी घटना घडणे आणि या घटनेबद्दल दिलगीरी व्यक्त करण्याऐवजी हा लाठीहल्ला झालाच नाही असे देवेंद्रपतांनी निर्लज्जपणे खोटे सांगणे हा निव्वळ योगायोग कसा समजावा?
वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेला लाठी हल्ला निषेधार्ह आहे. या घटनेची तात्काळ चौकशी लावून, संबंधितांवर कठोर कारवाई करुन तमाम वारकऱ्यांची सरकारने माफी मागावयास हवी होती. पण असे करण्याऐवजी गृहमंत्री देवेंद्रपंत ‘लाठी हल्ला झालाच नाही’ असे सांगून मोकळे झाले. पंतांना वारकऱ्यांप्रती आणि वारकरी सांप्रदायाच्या समतावादी विचारांप्रती कसलीही आस्था नाही, हे यातून स्पष्टपणे दिसून येते. ती असेल तरी कशी? मनुवाद, वर्णश्रेष्ठत्ववाद या अविचाराने चालणारा संघ-परिवार ही पतांची जननी आहे. गोळवलकर, हेडगेवार, सावरकर, भिडे हे पतांचे आदर्श आहेत. त्यामूळे शिवराय, महात्मा फुले, सावित्रीमाई, बाबासाहेब यांचा अवमान झाला काय किंवा वारकऱ्यांवर लाठी हल्ला झाला काय, पतांना या घटनांशी काय सोईरसुतक? सावरकरांचा अवमान झाला म्हणून ज्या पोटतिडकीने ‘मी सावरकर गौरवयात्रा’ काढली गेली, ती पोटतिडीक शिवराय, फुले, बाबासाहेब आणि वारकऱ्यांच्या अपमानाबाबत दाखवली जाणार नाही हे उघड आहे.
वारकऱ्यांवर लाठी हल्ला करणारे हात पोलिसांचे होते. पण या घटनेवर पडदा टाकणारा मेंदू संघ-भाजप परिवाराचा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
‘मऊ मेनाहूनी आम्ही विष्णूदास, कठीण वज्रास भेदू ऐसे I
भलेतरी देवू कासेची लंगोटी,
नाठाळ्यांच्या माथी हाणो काठी’ ही शिकवण तुकोब्बांनी आम्हास दिली आहे. ‘तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनी माराव्या पैजारा’ असेही त्यांनी सांगितले आहे.
वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या घटनेवर जाणीवपूर्वक पांघरुन टाकणाऱ्या तसेच तमाम महामानव व वारकऱ्यांप्रती कमालीचा कोडगेपणा दाखवणाऱ्या सडक्या मेंदूवर वारकरी मंडळी तुकोब्बांची, वारकरी सांप्रदायाच्या विचारांची शस्त्रास्त्रे घेवून प्रहार करीत राहतील, याबद्दल तिळमात्र शंका नाही.

ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)



