उजनीकाठच्या वीज कपातीस आमदार खासदार यांची संमती, जय वीरुची ही जोडी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलत नाही ,पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांचा खोचक सवाल

करमाळा प्रतिनिधी :उजनीकाठच्या वीज कपातीस आमदार खासदार यांची संमती, जय वीरुची ही जोडी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का बोलत नाही असा खोचक सवाल पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला आहे.
उजनीकाठचा शेतकरी वीज कपातीवरुन नाराज असताना आता पाटील गटाकडुन याबाबत विद्यमान आमदार यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात असुन याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की वास्तविक पाहता करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काची वीज आणि पाणी मिळवून देण्याची जबाबदारी ही आमदार पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीची असते. आमदार म्हणुन शासन दरबारी अधिकार वापरून त्यांनी मतदार संघातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. पण असे होताना दिसुन येत नाही.

उजनी हा आमदार महोदयांचा खुप आवडते ठिकाण आहे. ते नेहमी नौकानयन करण्यासाठी उजनी बॅक वॉटर परिसराला भेट देत असतात. यामुळे वीज कपातीचा निर्णय त्यांना माहिती नाही असे म्हणता येणार नाही. कदाचित त्यांना विचारुनच उजनी काठची वीज दोन तासांनी कपात केली असावी. माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी आजपर्यंत सतत या प्रश्नावर कायम लक्ष देऊन आणि तत्पर राहुन लढा दिला आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. सन २०१४ ते २०१९ दरम्यान सत्तेवर आमदार म्हणुन काम करत असतानाही वेळप्रसंगी या वीज कपातीवरुन रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची भुमिका तत्कालीन आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतली होती. मग अशी भुमिका आज आमदार संजय मामा शिंदे का घेत नाहीत हा खरा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उभे असलेल्या खासदार महोदयांनी तरी यावर जिल्हाधिकारी यांचेशी बोलायला पाहिजे होते. खासदार आणि आमदार या दोघांचीही घट्ट मैत्री आहे. परंतू शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मात्र जय वीरुची ही जोडी आज गप्प असल्याचा टोला तळेकर यांनी लगावला आहे. लवकरच माजी आमदार नारायण आबा पाटील हे उजनी काठच्या शेतकऱ्यांचे एक शिष्ट मंडळ बरोबर घेऊन जिल्हाधिकारी महोदयांना भेटणार असल्याचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले.



