महाराष्ट्राचे भवितव्य धोक्यातमहाराष्ट्राचे पानीपत करायला आधुनिक पेशवे सरसावले आहेत– ॲड. शीतल चव्हाण

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
केवळ राज्यालाच नाही तर देशाला व जगाला प्रेरणा देणारे, दिशा देणारे महान रत्न महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या महामानवांचे विचार हा महाराष्ट्राचा प्राण आणि अभिमान आहे. दिर्घ लढा देवून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. शेती, उद्योग, शिक्षण, सहकार अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने भरीव योगदान दिले. पण अलिकडच्या काही वर्षांपासून महाराष्ट्राला कुरघोडीच्या राजकारणाने ग्रासले आहे. भाजपाची दूष्ट नजर महाराष्ट्रावर पडली आहे.
महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग इतर राज्यात पळवले जात आहेत. सहकार क्षेत्र उध्वस्त झाल्याने, ग्रामीण भागात शेती आतबट्याची झाल्याने गावांकडून शहरांकडे होणारे स्थलांतरण झपाट्याने वाढले आहे. जलसिंचनाचा घोटाळा हा राजकीय सौदेबाजी करण्यासाठी शिक्का म्हणून वापरला जात आहे. जलयुक्त शिवाराच्या गप्पा आणि जाहीरातबाजीच जास्त झाली आहे. प्रत्यक्षात शेतकरी मात्र लाभापासून दूरच राहिला आहे. गावं भकास होत आहेत तर शहरे गर्दी वाढून बकाल होत आहेत. महाराष्ट्राच्या शेजारचे, नव्याने जन्माला आलेले आणि एकेकाळी महाराष्ट्रातील मराठवाड्यासह निझामाच्या हैद्राबाद संस्थानचा भाग असलेले तेलंगणा हे राज्य झपाट्याने प्रगती करीत आहे.
तिथे २४ तास वीज व २४ तास पाणीपुरवठा अत्यंत माफक दरात पुरवला जात आहे. जल आणि वीज या शेतकऱ्यांच्या विकासवाहीन्या आहेत. या विकासवाहीन्या तेलंगणात सळसळून वाहत आहेत. ‘तेलंगणा मॉडेल’ जगभर गाजत आहे. गुजरात या दुसऱ्या शेजारच्या राज्यावर मोदी-शहा-महाशक्तीचा वरदहस्त आहे. उद्योजकांना भरमसाठ सवलती, स्वस्तात जमीनी व स्वस्तात रोजगार देवून आकर्षित केले जात आहे. महाराष्ट्रात मात्र विकासापेक्षा नेत्यांच्या टीका-प्रतिटीका, सभा-उत्तरसभा, आपापसातील कुरघोड्या यांच्यावर सर्वत्र चर्चा सुरु आहे.
भाजपाने घडवून आणलेले खोक्या-बोक्याचे राजकारण, चक्क राज्यपालालाच हातातले खेळणे करुन मिळवलेली सत्ता याने महाराष्ट्राच्या संस्कृतीसह संविधानिक तत्वांना धुळीस मिळवले आहे. आता महाराष्ट्रातील बियाणे उद्योगही दक्षिणेकडील राज्यात तिथल्या सोयी-सवलतीने आकर्षित होवून जात असल्याची बातमी आली. बियाणांचे आगार असलेल्या जालन्याला ‘सीड हब’ करण्याच्या घोषणा तर कागदावरच राहिल्या उलटपक्षी असलेल्या बियाणे कंपन्याही इतर राज्यात जावून बियाणे उद्योगाला उतरती कळा लागली आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला शहरात उपऱ्यासारखे जगायला भाग पाडून, शेती क्षेत्राचे उध्वस्तीकरण करुन, उद्योगधंदे इतर राज्यात घालवून राज्यकर्ते महाराष्ट्राला कोठे नेवून ठेवणार आहेत? एकदा का महाराष्ट्रातील माणूस गलितगात्र झाला की मग हळूच मुंबईला केंद्रशासीत करण्याचा मुद्दाही पुढे सरकावला जाईल. मुंबई हातातून गेली आणि ग्रामीण भागातील कृषी संस्कृतीही उध्वस्त झाली की महाराष्ट्राची अवस्था माय-बाप गमावलेल्या व हाती काहीच साधन नसलेल्या अनाथासारखी होईल.
आजवर ताठ बाण्याने लढलेल्या, पुरोगामी विचारधारेची जननी असलेल्या महाराष्ट्राचे भवितव्य अशारितीने धोक्यात आहे. ते सुधारण्यासाठी आता लोकांनीच पुढे येवून विकासाचे मुद्दे ऐरणीवर आणणे ही काळाची गरज आहे. दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राच्या तख्तालाच तमाम मराठी लोकांनी जाब विचारत राहणे आणि महाराष्ट्राच्या विकासालाच राजकारणाचा केंद्रबिंदू करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा आधुनिक पेशव्यांकडून महाराष्ट्राचे पानीपत व्हायला वेळ लागणार नाही.
ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो.9921657346)



