महाराष्ट्र

कोश्यारींच्या मस्तीचे धोतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने फेडले आता ‘फॅसिस्ट’ वृत्तीची काळी टोपी उडवण्याची जबाबदारी आपली.-ॲड.शीतल शामराव चव्हाण. पुणे

ज्येष्ठ पञकार—बी.टी.शिवशरण
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात कुठल्याही राज्यपालाने उधळली नसतील एवढी मुक्ताफळे भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल पदावर असताना उधळली आहेत. शिक्षणाची द्वारे तमाम बहुजन वर्गासाठी आणि महिलांसाठी खुली करुन भारतात शैक्षणिक क्रांती आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांची अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरुन खिल्ली उडवली,

छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे वक्तव्य केले आणि गुजराती, मारवाड्यांशिवाय मुंबईला काही किंमत नाही असे म्हणून मुंबईच्या वैभवात भर घालणाऱ्या तमाम श्रमिकांचा अवमान केला. या सगळ्या वक्तव्यांमागे कोश्यारींच्या पाठीशी असलेल्या ‘महाशक्ती’च्या सत्तेची मस्ती होती.

एवढी मुक्ताफळे उधळून झाल्यावर महाराष्ट्र भरात टीकेची झोड उठली. खरं तर कोश्यारी हे वयाने बुजुर्ग. ज्येष्ठांवर टीका करताना लहानांनी मर्यादा पाळाव्यात ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. पण महाराष्ट्राचेच नव्हे तर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या जगातील तमाम जनतेचे प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवराय, महात्मा फुले व सावित्रीमाईंच्या बाबतीत कोश्यारी यांनी पातळी सोडून विधाने केल्याचे कळताच चवताळलेल्या लोकांनी मर्यादा सोडूनही कोश्यारींवर टीका केली. पण कोश्यारी एवढे निर्ढावलेले की जनाची नाही तरी मनाची लाज बाळगूनही त्यांनी चटकन राजीनामा देवून जनतेची जाहीर माफी मागितली नाही.

कोश्यारींचे हे निर्ढावलेपणे अन् वाट्टेल ते बोलण्याची मस्ती ज्या सत्तेतून आली त्या सत्तेचे धोतर फेडणे आवश्यक असल्याचे मी त्या काळात माझ्या भाषणांतून सांगत होतो.

आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान देशाचे ‘चीफ जस्टीस’ मा. धनंजय चंद्रचूड यांनी सत्तासंघर्षादरम्यान राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करीत कडक ताशेरे ओढले आहेत. बंडखोर आमदारांनी गटनेता नेमणूकीसाठी व प्रतोद नेमणूकीसाठी राज्यपालांना पत्र दिलेले असताना राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश देवून सरकार पाडण्यात पहिले पाऊल उचलले आहे, असे निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. राज्यपालाने सरकार स्थिर राहण्यासाठी नि:पक्षपातीपणे काम करणे आवश्यक असते. पण सरकार पाडण्यासाठी राज्यपालाने काम करुन चुकीचा पायंडा पाडण्यासह महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान राज्यपालांची भूमिका चुकीची असल्याचे सांगत राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत.

सत्तेचे वारे आपल्या बाजूने आहे या मस्तीत भगतसिंग कोश्यारी यांचे धोतर मलबार हिलवर जोरजोरात फडफडत होते. नको ती विधाने करण्यासह पक्षपाती भूमिका घेण्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. पण सुनावणीदरम्यान ‘तीन वर्ष सुखाने चाललेला महाविकास आघाडीचा संसार एका रात्रीत कसा कोलमडला? असे काय झाले? हे राज्यपालांनी बंडखोर आमदारांना विचारायला हवे होते.’ असा सवाल करीत सतत फडफडणाऱ्या कोश्यारींना न्यायालयाने जमीनीवर आणले आहे. बंडखोर आमदारांनी बहुमत चाचणीच्या आदेशाची मागणी न करताच सलग सहा वेळेस अशा चाचणीसाठी पत्र राज्यपालाने काढली. ही संघ-भाजपाचा हात डोक्यावर असल्याने चढलेली मस्ती नव्हती तर काय होते?

आज सर्वोच्च न्यायालयाने नेमक्या मुद्द्यांवर बोट ठेवत राज्यपालांच्या काळ्या टोपीखालच्या मेंदूतील काळा विचार उघड केला. कोश्यारींच्या मस्तीचे धोतर आज अखेर सर्वोच्च न्यायालयाने उभ्या देशासमोर फेडले. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लागलेला काळा डाग धुवून काढण्याचा प्रयत्न केला आणि संविधानातील मुलतत्वांच्या रक्षणाची न्यायालयाची जबाबदारी खऱ्या अर्थाने निभावली.

सर्वोच्च न्यायालयाने आपले काम प्रामाणिकपणे केले. आता जनतेच्या न्यायालयातील फैसलाही जवळ आला आहे. मतपेट्यांतून हा फैसला जनतेला द्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सत्तेच्या मस्तीचे धोतर फेडले, आता आपल्याला ‘फॅसिस्ट’ वृत्तीची काळी टोपी उडवण्याची जबाबदारी पार पाडायची आहे.

ॲड. शीतल शामराव चव्हाण,पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button