श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाल्यास विठ्ठलची पुनरावृत्ती होणार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांचा दावा.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक झाल्यास ‘विठ्ठल’ची पुनरावृत्ती ‘आदिनाथ’ मध्ये होणार, असे स्पष्ट संकेत माजी आमदार नारायण पाटील गटाकडून आज प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिले. करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा सर्वत्र चालू आहे.एकीकडे काही सामाजिक कार्यकर्ते ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत असताना तळेकर यांच्या या सुचक वक्तव्याने चर्चेत अधिक रंगत निर्माण झाली आहे. याबाबत अधिक स्पष्ट बोलताना तळेकर यांनी सांगितले की श्री आदिनाथ कारखाना हा आजमितीस सुस्थितीत येण्यासाठी आपली वाटचाल करत आहे.
यासाठी एका खंबीर व पारदर्शक कारभार करणार्या नेतृत्वाची गरज आदिनाथच्या सभासदांना अधिक प्रमाणात जाणवत आहे. आणि माजी आमदार नारायण पाटील यांच्याकडे आदिनाथला सुस्थितीत आणण्याची क्षमता आहे. यामुळेच जर संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक झाल्यास ज्या प्रकारची क्रांती पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत झाली व अभिजीत पाटील यांच्या कडे एकहाती या कारखान्याची सुत्रे सभासदांनी दिली, अगदी त्याच प्रमाणे आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत सुद्धा माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला सभासदांचा भक्कम पाठिंबा असणार आहे.

पंढरपूर प्रमाणेच करमाळा तालुक्यातील सभासद सुद्धा या बदलासाठी अधिक उत्सुक आहेत. संचालक मंडळाकडून एकसुत्रता आणि पारदर्शक कारभाराची हमी सभासद मतदारांना हवी आहे. सभासदांचा विश्वास माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वावर कायमच राहीला आहे. आदिनाथ कारखान्याच्या संचालक मंडळास कायमच बंडाळीघा वा फुटीचा शाप आहे. परंतू माजी आमदार नारायण पाटील यांच्या कडे सर्वांना एकत्रीत ठेऊन आदिनाथचा बंडाळीचा हा इतिहास बदलण्याची ताकद आहे.
आमदार म्हणून त्यांनी 2014 ते 2019 मध्ये मतदार संघाचा जो विकास केला, विक्रमी निधी खेचुन आणला ते पाहून आजमितीस आदिनाथला अशाच पाठपुरावा करुन अविरत काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. ती जिद्द व चिकाटी माजी आमदार नारायण पाटील यांच्यात असल्याने विठ्ठलची पुनरावृत्ती आदिनाथ निवडणूकीत होणार हे निश्चित असल्याचा पुनरुच्चार तळेकर यांनी केला.
तसेच आज सत्तेत नसतानाही जर आदिनाथ वाचवण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील हे झोकुन देऊन काम करु शकत असतील तर उद्मा निवडणुकीनंतर सभासद जेंव्हा अधिकृतपणे त्यांना अधिक जोमाने काम करण्याचे अधिकार देत असतील तर ही बाब तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व कामगारांना आनंद देणारी अशीच असणार आहे असेही तळेकर यांनी सांगितले.तसेच माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत उतरण्यासाठी निस्पृह व कोऱ्या पाटीचे शेकडो कार्यकर्ते उत्सुक असून करमाळा तालुक्यातील सहकार अधिक बळकट होण्याचे हे एक चांगले लक्षण असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.



