पालघर जिल्ह्यातील जव्हार मध्ये याची देही, याची डोळा” भव्य जगन्नाथ रथयात्रा संपन्न ..

टाईम्स 9 मराठी न्यूज न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा देवी यांची दुसरी भव्य रथयात्रा शनिवार दिनांक 28 जून 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील जव्हार नगरीत “याची देही, याची डोळा” या दिव्य अनुभूतीसह अत्यंत भक्तिभावात पार पडली.
पुरीचे चार धामांपैकी एक असलेले जगन्नाथधाम आता जव्हारमध्येही प्रकट होत आहे, आणि या प्राचीन परंपरेचा महिमा इथेही दिसून येत आहे.

या रथयात्रेची सुरुवात राजे यशवंतराव मुकणे महाराज यांचा पुतळा येथून झाली. रथाने राम मंदिर आणि प्रगती प्रतिष्ठान मार्गावरून नगरपरिक्रमा केली. रथ ओढताना गावकऱ्यांनी, महिलांनी आणि लहान मुलांनी भक्तिरसात न्हालेलं वातावरण निर्माण केलं.या कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (ISKCON) – गोवर्धन इको व्हिलेज आणि जव्हारमधील स्थानिक भक्तगण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
रथयात्रा मार्गावर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, गीत-नृत्य सादर करण्यात आले. यावेळी महिला भक्तांची विशेष गर्दी हे यंदाचे वैशिष्ट्य ठरले.

“हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे”
या महामंत्राच्या गजरात मृदंग, करताल व अन्य वाद्यांच्या तालावर भाविकांनी आनंदात नृत्य केले.
यानंतर रथ प्रगती प्रतिष्ठान येथे पोहोचल्यावर श्री जगन्नाथ, बलराम, आणि सुभद्रा माई यांना ५६ भोग अर्पण करण्यात आले. त्यानंतर भावपूर्ण महाआरती पार पडली याकार्यक्रमास आमदार भोये यांच्यासह अनेक मान्यवर व मोखाडा, खोडाळा, पाथर्डी, डोहरे पाडा, साकुर आदी गावांतून अनेक हरिभक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.



