गोड साखरेची कडू कहाणी, सांगतो ऊसतोड कामगारांची कहाणी.महेश बजरंग कोळेकर

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो.9730 867 448
तिखट लागलं की साखर आठवते, सणावाराला गूळ आठवतो, चपाती सोबत खायला पाक आवडतो. पण ऊस कधी कोणाला आठवत नाही. तो ऊस तोडणारा तर आठवणे खूप लांबची गोष्ट आहे. पहाटेच्या तीन वाजले पासून ऊसाच्या फडात राबराबणारी ती ऊसतोड कामगारांची टोळी आणि सोबत ऐटीत असणारा मुकादम. लहान लहान तान्ही लेकरं उसाच्या पाचताट तोंड खुपसून आईबापच कष्ट उघड्या डोळ्यांनी पाहत असतात. कोणाची वाड गोळा करण्याची लगबग तर कोण्या माऊलीची लेकरांना दूध पाजण्याची घाई.
किती भयानक परिस्थिती ती…! उसाच्या कुशीने, पाचटाचे अंगावर पडलेले ओरखाडे फाटलेले कपडे आणि हातात कोयत हेच त्यांचं खर दागदागिने. आज याच्या फडावर तर उद्या दुसऱ्याच्या फडावर रोज एक नवीन संकट रोज एक नवीन जागा रोज नवा दिवस पण परिस्थिती तीच दुःख तेच. उसाच्या मोळ्या उचलून उचलून डोकं बधिर होऊन जातं. पण रात्रीची बातच न्यारी असते हा… गरमा गरम भाकरी, सोबत कांदा आणि बोंबील, सुकट ची केलेली मस्त चमचमीत भाजी. आणि चेहऱ्यावर असणार प्रामाणिक कष्टाचं तेज.

वा दिवसभराचा थकवा सारा एका क्षणात पळून जातो. रोज नवीन जागा रोज नवीन रात्र आणि रोज नवा अनुभव या सगळ्या गोष्टीतून आयुष्य मात्र ढवळून निघत. मग प्रश्न पडायला लागतो पोराबाळांच्या शिक्षणाचा आणि आयुष्याचा. मग वाटायला लागते खऱ्या अर्थाने चिंता. वाड वेचनारा हात आणि कोयत धरणारा हात जेव्हा पुस्तक आणि पेन हातात द्यायला लागतो. तेव्हा खऱ्या अर्थाने उसाच्या फडात निर्माण होत एक चालत बोलत शंभर खणी असणार विद्यापीठ आणि बरच काही. आयुष्याला वळण मिळायला लागत.
दुखणं अंगावर काढुन उसाच्या पाचटात स्वतःला दाबून घेऊन फक्त कष्टच करावं लागतं. आणि मग घडतात याच उसाच्या पाचटातील हिरे. सोबत कारभारीन घेऊन तो उन्हातान्हात लढत असतो ऊस नावाच्या शत्रूसोबत आणि घडवत असतो आपल्या अनेक पिढ्या त्या उसाच्या पाचटात गुदमरून झोपलेल्या हिऱ्यात. जणू उसाचा फड, त्याला दाखवतच असतो त्याच्या आयुष्याचा कड. चल वड मित्रा वड. चुकून कोयता जेव्हा हातावर लागतो तेव्हा रक्ताची चिलकांडी उडते. सोबत पाठीमागे वाड वेचनारी बायको पळत येऊन आपल्या साडीचा पदर फाडुन नवऱ्याच्या हाताला बांधते हे प्रेम कुठं आणि प्रॉपर्टी साठी नवऱ्याचा खून करणारी बायको कुठं. किती फरक आहे विचारात प्रेमात आणि संस्कारात.

मोळी डोक्यावर घेऊन जाताना तोल जातो बायको मोळीसगट खाली पडते नवऱ्याच्या जिवाच पाणी पाणी होत. मन मात्र जळून खाक होत. रात्री तो तिचे पाय दाबतो सांगा आता मला तुम्हीच यात तुम्हाला कुठला पती दिसतो. रोज ऊस तोडणाऱ्याच्या ही चहामध्ये हवी तेवढी साखर नसते, त्यांच्या सणावाराला गूळ नसतो. का? त्यांना सणवार , जीव नसतो. ऊस तोडता तोडता अचानक एखाद मव्हाळ उठत मधमाशा सगळ्या अंगाला तोंडाला चावतात.
सुजलेला चेहरा फाटक्या टावेलात लपवून तो पुन्हा कामाला लागतो. आणि ऑफिस मध्ये साखर जास्त झाली म्हणून बॉस आपल्या नोकरांच्या तोंडावर चहा फेकून मारतो. वाटत तितकं सोपं नसत आयुष्य. सर्ज्या राजाला सोबत घेऊन उसाने भरलेली गाडी कारखान्याला पोचवावी लागते. कधीकधी बैलांची पण मन ओळखून गाडी नवरा बायकोने ओढावी लागते. त्या मुक्या जीवांना ही जपावं लागतं, त्यांच्या ही डोळ्यात पहावं लागत. पेंड,भुसा, खाऊ घालून त्यांचं मन राखाव लागत, सांगा त्या कडू साखरेला सर्वांशीच आम्हाला गोड रहावं लागत.
लेखक- महेश बजरंग कोळेकर
रा-काक्रंबावाडी ता-तुळजापूर जि-धाराशिव.
संपर्क-9146133047



