इंदापूर पोलीसांची अवैध गुटख्यावर कारवाई, अठरा लाखांच्या गुटख्यासह २४ लाखांचा मुद्देमाल जप्त. दोन आरोपींना तात्काळ अटक

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल – 8378081147
इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत अकलूज ते इंदापूर महामार्गावरून अवैद्य प्रतिबंधित सुगंधी पान मसाला गुटखा याची बेकायदेशीरित्या वाहतूक होत असले बाबत गोपनीय माहिती इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार बालगुडे व पोलीस शिपाई राखुंडे यांचे पथक कारवाई करीता रवाना केले.

सदर पथकाने बावडा ते इंदापूर महामार्गावरती सापळा रुचून एक संशयित पिकअप गाडी नंबर MH 13 DQ 2496 येताना दिसला. त्यास हात दाखवून बाजूला घेण्यास सांगितले असता त्यामध्ये मानवी जीवितास अपायकारक असा अवैध प्रतिबंधित सुगंधी पान मसाला गुटखा १८०८८००/- रुपये किमतीचा मुद्देमाल व एक जुनी वापरातील पिकअप ६०००००/-रुपये किमतीची असा एकूण २४०८८००/-रुपये किमतीचा मुद्देमाल सदर कारवाई मध्ये जप्त करण्यात आला. गाडी चालक व त्याचा साथीदार दोघांना ताब्यात घेऊन इंदापूर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच महाराष्ट्र राज्य अन्न व सुरक्षा आयुक्त यांचा प्रतिबंधित आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यांमध्ये गाडी चालक व त्याचा साथीदार याला अटक करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, योगेश लंगुटे, पोलीस हवालदार बालगुडे, पोलीस शिपाई विकास राखुंडे यांनी केली.



