महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जुन्या पेन्शनसाठीचे राजपत्रित अधिकाऱ्यांचे नियोजित आंदोलन स्थगित !

उपसंपादक—- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनांनी दि. १४ मार्च, २०२३ पासून नियोजित बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर, राजपत्रित अधिकारी महासंघाने देखील दि. १३ मार्च, २०२३ रोजी राज्य शासनास संपाची नोटीस देऊन दि. २८ मार्च, २०२३ पासून बेमुदत संपात सक्रीय सहभागाचा निर्णय घेतला. १ नोव्हेंबर, २००५ नंतर राज्यसेवेत रुजू झालेल्या तब्बल ५५% अधिकारी-कर्मचाऱ्यांना भांडवली बाजाराशी संबंधित नवीन पेन्शन योजना लागू असून, सेवानिवृत्ती अथवा सेवाकालातच मृत्यू पावलेल्या अशा कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंजे लाभ मिळत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास आले.

असुरक्षित गुंतवणूक आणि निश्चित परताव्याची हमी नसलेल्या नवीन पेन्शन योजनेमुळे नवीन पेन्शनधारक भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत चिंतेत असून, जुन्या पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्यावर राज्यात उग्र आंदोलनात्मक स्थिती निर्माण झालेली आहे. नियोजित आंदोलनासंदर्भात राज्याचे मा. मुख्यसचिव श्री. मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली आज पुनश्च अधिकारी महासंघासमवेत बैठक पार पडली व त्यानंतर आजच दुपारी २ वा. मा. मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचेशी विधानभवनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

सदर चर्चेत मा. मुख्यमंत्री महोदयांनी जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्य शासनाने दि. १४ मार्च, २०२३ रोजीच समिती गठीत केलेली असून, त्याचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करुन घेण्याचे आश्वासित केले, तसेच यासंदर्भात “जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेची हमी देण्याचे धोरण” तत्व म्हणून राज्य शासन मान्य करीत असल्याचे देखील लिखित स्वरुपात आश्वासित केले आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील गारपीटग्रस्तस्थिती आणि विस्कळीत आरोग्यसुविधा लक्षात घेऊन नियोजित आंदोलन मागे घेण्यासंदर्भात आवाहन केले. राज्य शासनाने दिलेले लिखित आश्वासन व मा. मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने दि. २८ मार्च, २०२३ पासूनचे नियोजित बेमुदत संप आंदोलन स्थगित केले आहे.

विधानभवनात संपन्न झालेल्या या बैठकीत, शासनाच्या वतीने मुख्यसचिव यांचेव्यतिरिक्त, अपर मुख्यसचिव (वित्त) श्री.मनोज सौनिक; अपर मुख्यसचिव (सेवा) श्री. नितीन गद्रे; मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्यसचिव श्री. भूषण गगराणी; सचिव (सा.वि.स.) श्री. सुमंत भांगे, तर महासंघाच्या वतीने संस्थापक व मुख्य सल्लागार श्री. ग. दि.कुलथे; अध्यक्ष श्री.विनोद देसाई; सरचिटणीस श्री. समीर भाटकर; कायम निमंत्रित श्री. रवींद्र धोंगडे; संघटन सल्लागार इंजि.विनायक लहाडे; राज्य संघटक श्री. सुदाम टाव्हरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ग. दि. कुलथे (मुख्य सल्लागार )
विनोद देसाई (अध्यक्ष)
समीर भाटकर (सरचिटणीस)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button