खासदार राजेंद्र गावित यांच्या मागणीला यश…..रेल्वे प्रशासन वैतरणा पुलावर पादचारी पुल उभारणार

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्ह्यातील वाढीव गावातील ग्रामस्थांना वैतरणा पुलावरून रोज जीवघेणा प्रवास करावा लागतो या प्रवासात शाळकरी लहान विद्यार्थ्यांपासून अनेक प्रवाशांना या पुलावरून प्रवास करताना आपला जीव गमवावा लागला आहे. म्हणून या पुलावर पादचारी पूल रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर उभारावा अशी मागणी खासदार राजेंद्र गावित यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती.
खासदार राजेंद्र गावित यांनी केलेल्या या मागणीला यश आले असून वैतरणा पुलावर पादचारी पूल बनविण्यात येणार असल्याची ग्वाही पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अशोक मिश्र यांनी खासदार राजेंद्र गावित यांना चर्चगेट रेल्वे भवन येथे आयोजित केलेल्या बैठकीत दिली आहे . खासदार राजेंद्र गावित यांनी पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते चर्चगेट रेल्वे प्रश्नांवर महाप्रबंधक यांच्यासह विविध विभागाची बैठक गुरुवार दिनांक 9 मार्च 2023 रोजी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट रेल्वे भवन येथे आयोजित केली होती. या बैठकीत वसईच्या पाणजू बेटाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला असल्याची माहिती महाप्रबंधक मिश्र यांनी खासदार राजेंद्र गावित यांना या बैठकीत दिली.
भाईंदर पुलावरून पाणीपुरवठा जलवाहिनी पाणजू येथे आणण्यासाठी सुमारे 9 कोटी रुपये मंजूर झाल्याने येत्या काळात या कामालाही सुरुवात होऊन पाणजूवासीयांचे पाणी संकट टळणार आहे. तसेच डहाणूहुन सकाळी 7.05 वाजताची लोकल पूर्ववत करण्याची खासदारांची मागणी ग्राह्य धरत ती पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. खानदेश एक्सप्रेसला डहाणू येथे लवकरच थांबा दिला जाईल त्यासाठी प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेत हा थांबा विचारविनिमय करून लवकरच देऊ असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने प्रवासी वर्गासह गावित यांना दिले आहे.

वांद्रे अजमेर मैसूर या रेल्वेगाडीला पालघर येथे थांबा द्यावा अशी सूचना खासदार गावित यांनी केली असून दौंड इंदोर पुणे, वांद्रे भावनगर,वांद्रे भुज- कच्छ, दादर बिकानेर, वांद्रे पाटणा, वांद्रे गझिपुर एक्सप्रेसना पालघर येथे प्रवासी वर्गाच्या मागणी लक्षात घेऊन थांबे द्यावे अशी आग्रही मागणी गावित यांनी रेल्वे महाप्रबंधक मिश्र यांना केली.
पश्चिम रेल्वेच्या डहाणू वैतरणा रेल्वे स्थानकांदारम्यान भौतिक सुविधा प्रवासी सुरक्षा, सरकते जिने, अतिक्रमण, शीत शवागारगृह, रेल्वे गाडी माहिती सूचना दर्शक इंडिकेटर, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा प्राप्त करून द्या अशीही मागणी या बैठकीत खासदार गावित यांनी रेल्वे प्रशासनाकडे केल्यावर विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पात या सुविधा अपूर्ण असून लवकरच प्रकल्पासह या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील असे मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाने यावेळी माहिती दिली.डहाणू-वैतरणा दरम्यान सध्या बारा डब्याच्या लोकल धावत आहेत. पंधरा डब्यांच्या लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्याची आवश्यकता यावेळी खासदारांनी व्यक्त केली. पनवेल डहाणू मेमु सकाळी व संध्याकाळच्या वेळेस दोन फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींमार्फत करण्यात आली.यावर वेळापत्रक लक्षात घेऊन फेरी वाढविण्याचा विचार करू असे महाप्रबंधक मिश्र यांनी सांगितले.

ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी डहाणू नाशिक रोड रेल्वेचा विचार करणे गरजेचे आहे. सर्वेक्षणासाठी निधीही मंजूर होता. मात्र या लाईनचा विचार रखडत आहे. त्यामुळे या रेल्वेलाईनसाठी रेल्वेने विचार करून तातडीने सर्वेक्षण केल्यास व जोड लाईन अमलात आणल्यास येथील स्थलांतर कुपोषण असे प्रश्न दूर होतील व रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊन ग्रामीण भागाचा शाश्वत विकास होऊ शकतो असे गावित यांनी या बैठकी सांगितल्यानंतर संबंधित अधिकारी वर्गाने या मार्गाचा विचार करून आवश्यक कार्यवाहीसाठी पावले उचलली जातील असे आश्वासन दिले या बैठकीत खासदार गावित यांच्यासह महिला प्रवासी रेल्वे प्रवासी संघटना प्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाशी संबंधित विविध अधिकारीवर्ग उपस्थित होते.



