संपादकीय

आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने
संध्या गणेश जाधव. अंगणवाडी सेविका अकलूज.

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जागतिक महिला दिन हा प्रामुख्याने महिलांच्या सशक्तिकरणासाठी, महिलांना सन्मान देण्यासाठी, पुरूष आणि महिलांमधील भेदभाव कमी करण्यासाठी आणि महिलांना त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी साजरा केला जातो. खरंतर आज महिलांनी जवळजवळ सर्वच क्षेत्रात उंच गरुड भरारी घेतलेली आहे. त्यामुळे आता हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात एखाद्या सणा प्रमाणे साजरा केला जातो. मात्र असं असूनही आजही अनेकांना जागतिक महिला दिन का साजरा केला जातो आणि त्यामागचा इतिहास काय हे माहीत नाही.

पूर्वीच्या काळी शिक्षणाप्रमाणेच मतदानाचाही अधिकार महिलांना नाकारण्यात आलेला होता. 1908 साली हा अधिकार मिळावा यासाठी न्यूयॉर्क शहरात पहिल्यांदा महिलांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. त्यात महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा , नोकरीची वेळ कमी करावी आणि नोकरीच्या ठिकाणी सुरक्षितता या तीन प्रमुख अटींची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे स्त्रीयांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली होती. या आंदोलनानंतर 28 फेब्रुवारी हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. मात्र नंतर आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडण्यात आलेल्या सूचनेनुसार पुढे 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निवडण्यात आला. तेव्हापासून आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची पद्धत सुरू झाली.

आजही महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या या लढ्याच्या स्मरणार्थ 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाची सुरूवात या कामगार आंदोलनातून झालेली असली तरी, आता मात्र या दिवसाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे ही एक आनंदाची बाब आहे. काही ठिकाणी या निमित्ताने महिलांना सुट्टी दिली जाते. तर काही ठिकाणी महिलांसाठी खास कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते.वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान केला जातो.मात्र असं असलं तरी जीवनात स्त्रीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्यामुळे वर्षातून फक्त एक दिवस असा उत्सव साजरा करून तिची महती नक्कीच गायली जाणं शक्य नाही. यासाठी वर्षाचा प्रत्येक दिवस हा स्त्रीच्या सन्मानाचा, स्त्रीच्या कलागुणांना वाव देणारा, तिची प्रतिष्ठा अधिकाधिक वाढवणारा असायला हवा.

वास्तविकता महिला दिन कसा साजरा केला जावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. मात्र जर या पद्धतीने महिला दिन साजरा केला तर खरंच तुमच्या आयुष्यातील महिलांना तुम्ही खऱ्या अर्थाने आनंदी करू शकाल.

तुमच्या ओळखीच्या अथवा कामाच्या ठिकाणी असणाऱ्या महिला सहकाऱ्यांसाठी तुम्ही एखादी स्पर्धा आयोजित करू शकता. ज्यामध्ये स्वयंपाक,अभिनय, गायन, कलाकुसर, फोटोग्राफी, लेखन अशा अनेक कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा तुम्ही ठेवू शकता. अशा कार्यक्रमातून महिलांना आयुष्यात काही तरी चांगलं करण्याची उर्मी मिळू शकते. शिवाय त्यांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनातून काही काळासाठी छान ब्रेक मिळू शकतो.

एखादा कार्यक्रम अथवा पार्टी आयोजित करावी. जेणेकरून तुमच्या आयुष्यातील सर्व महिलांसाठी तुम्ही एखादा छोटेखानी कार्यक्रम अथवा पार्टी आयोजित करू शकता. ज्यामधून तुम्ही त्यांच्या आवडीचे खेळ, गाणी, डान्स, आवडीचे पदार्थ अशा गोष्टी त्यांच्यासाठी करू शकता. ज्या ज्या महिलांचा तुमचे आयुष्य सुखकर करण्यासाठी हातभार लागला आहे अशा सर्व महिलांची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी या निमित्ताने तुम्हाला मिळेल.

मी स्वतः 2011 पासून माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील अंबाबाई रोड -2येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत आहे. सदर काम करीत असताना आम्ही अंगणवाडी च्या माध्यमातून वर्षभर विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असतो. सण, उत्सव, विविध प्रकारचे दिवस साजरे करीत असतो. यासाठी आम्हाला आमचे बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका , यांचे नेहमीच चांगले सहकार्य लाभते.

सौ. संध्या गणेश जाधव. अंगणवाडी सेविका. अंबाबाई रोड -2.अकलूज.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button