शिरसाटवाडीत विविध उपक्रमांनी गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरीकल्पवृक्ष कृषी विकास संस्थेतर्फे रक्तदान शिबिर; १०१ बाटल्या रक्त संकलित

शेळगाव प्रतिनिधी रसूल पठाण Times 9 Marathi News Network
शिरसाटवाडी: येथील कल्पवृक्ष कृषी विकास संस्था आणि श्री स्वामी समर्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना ग्रामस्थांचा व तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१०१ रक्त बाटल्यांचे संकलन गुरुपौर्णिमेनिमित्त कल्पवृक्ष कृषी विकास संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात परिसरातील तरुण युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले. शिबिरात १०१ रक्त बॉटल संकलित करण्यात आल्या. युवकांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या रक्तदान शिबिराच्या प्रसंगी शिरसाटवाडी गावचे प्रतिष्ठित नागरिक लालासाहेब पवार (आबा), सोमेश्वर डोंगरे, गणेश पवार, नानासाहेब रावण, किरण भुजबळ, गणेश बाळासाहेब पवार, विकास कदम, सतीश जाधव, अजित पवार, भरत माने, होनाजी हगवणे, दशरथ नागळे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रंथ पारायण, नगर प्रदक्षिणा आणि महाप्रसाद
सामाजिक उपक्रमांसोबतच धार्मिक कार्यक्रमांचीही रेलचेल पहायला मिळाली: श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ पारायण: श्री स्वामी समर्थ मंडळाच्या वतीने दुपारी १ ते ३ या वेळेत ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
ग्राम प्रदक्षिणा: संध्याकाळी ७ वाजता ग्रामदैवत श्री मारुती आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरण पादुकांची गावातून अत्यंत उत्साहात प्रदक्षिणा (पालखी सोहळा) काढण्यात आली. या वेळी श्रीराम भजनी मंडळाने भजनाची उत्तम साथ दिली.
महाप्रसाद: गुरुपौर्णिमेच्या या पावन प्रसंगी सौ. मीनाक्षी गजानन बाबर (पिंपरी) यांच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिर आणि धार्मिक कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनामुळे यंदाची गुरुपौर्णिमा शिरसाटवाडीत अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडली.



