आई लहान बहिणीवर जास्त प्रेम करते या नकारात्मक विचारातून घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या दोन तासात सफाळे पोलिसांनी घेतला शोध

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
आई लहान बहिणीवर जास्त प्रेम करते या नकारात्मक विचारातून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याच्या उद्देशाने घरातून निघून गेलेल्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा सुरक्षित शोध घेण्यात सफाळे पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांच्या पथकाला यश आले आहे.
सफाळे पोलिसांच्या तत्पर आणि संवेदनशील कारवाईमुळे एक संभाव्य अनर्थ टळला असून हरवलेल्या या मुलीला अवघ्या दोन तासात सफाळे पोलिसांनी झांजरोळी धरण येथून शोध घेऊन तिला सुखरूप पणे तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे.
सफाळा पोलीस ठाणे हद्दीतील केळवा रोड पूर्वेकडील झांजरोळी गावातील ही घटना गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी घडली आहे .ही अकरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ‘आई लहान बहिणीवर अधिक प्रेम करते’ या भावनिक गैरसमजातून गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता घरातून रागाने निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ हालचाल केली.
सफाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ता शेळके व पोलिस कर्मचारी यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. यावेळी ही अल्पवयीन मुलगी झांजरोळी धरण परिसरात आढळून आली. सुदैवाने तिला कोणतीही शारीरिक इजा झाली नव्हती. त्वरित या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन करून तिच्या मनातील नकारात्मक विचार दूर केले व तिचे मनपरिवर्तन केले. त्यानंतर तिला सुरक्षितरित्या तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे .
या घटनेतून पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद साधण्याची गरज अधोरेखित झाली आहे. लहान मुलांचे मन नाजूक असते. त्यामुळे त्यांच्या भावना समजून घेत त्यांना भावनिक आधार देणे अत्यंत महत्त्वाचे असून मुलांनी कोणतीही अडचण असल्यास आई-वडील शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तीशी मोकळेपणाने संवाद साधावा असे आवाहन सफाळे पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी पालक वर्ग व नागरिकांना केले आहे.



