पालघर लोकसभा खासदार डॉ. हेमंत सवरा यांना सफाळे कुर्लाई देवी मंदिर रस्त्याबाबत निवेदन देताना ग्रामस्थ

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर तालुक्यातील सफाळे गाव ते कुर्लाई देवी मंदिर जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्याचे डांबरीकरण अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत कुर्लाई मातेची जत्रा होणार असून लाखो भाविक या मार्गाचा वापर करणार आहेत. मात्र रस्त्याची बिकट अवस्था पाहता भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सफाळे–वरई राज्यमार्गाशी जोडणाऱ्या या रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आले होते. सुमारे महिनाभरापूर्वी रस्त्यावर खडी टाकून कामाची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे लवकरच डांबरीकरण पूर्ण होईल अशी अपेक्षा ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर कामात कोणतीही लक्षणीय प्रगती न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढीस लागली आहे.

सध्या स्थितीत हा रस्ता उखडून ठेवण्यात आल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी खड्डे व सैल खडीमुळे दुचाकीस्वारांना वाहन चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत असून घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर श्री ग्रामदेवी कुर्लाई विश्वस्त मंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांना निवेदन देत तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे.



