महाराष्ट्र

अकलूज पोलीस ठाण्यात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ उत्साहात साजरा; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

Times 9 Marathi News Network

​अकलूज : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज, ८ मार्च रोजी अकलूज पोलीस ठाणे येथे महिलांच्या सन्मानार्थ एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रशासकीय, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला.

​या कार्यक्रमास अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रेश्माताई आडगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबतच नगर परिषदेच्या महिला नगरसेवक, अकलूज पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत असलेल्या महिला पोलीस पाटील, महिला होमगार्ड आणि महिला दक्षता समितीमधील डॉक्टर, वकील, शिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदारांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व महिला पाहुण्यांचा शाही फेटा बांधून, पुष्पगुच्छ आणि पर्यावरणाचे प्रतीक म्हणून फुलांचे रोप (झाड) देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. खाकी वर्दीतील महिला आणि नागरी क्षेत्रातील महिला अशा सर्वांच्या उपस्थितीने पोलीस ठाण्याचा परिसर भारावून गेला होता.

​यावेळी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. दैनंदिन जीवनात आणि कामाच्या ठिकाणी महिलांना भेडसावणाऱ्या अडीअडचणी, समस्या आणि त्यावर कशा प्रकारे मात करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शनपर विचार मांडण्यात आले.

​कार्यक्रमात मुख्यत्वे महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मदतीने महिलांनी स्वतःच्या हक्कांप्रती जागरूक राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या वतीने महिलांच्या सुरक्षेसाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहितीही या निमित्ताने देण्यात आली.

​अत्यंत उत्साही आणि सकारात्मक वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button