भाजप नगरसेवक महेश शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; अकलूजमधील ‘आरएमसी’ प्लांटला अखेर ब्रेक

Times 9 Marathi News Network
अकलूज : अकलूज येथील प्रभाग क्रमांक ८ मधील कृष्णलीला हॉटेलसमोर, लोकवस्तीच्या परिसरात सुरू असलेल्या आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांट उभारणीला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आणि भाजप नगरसेवक महेश शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर यश आले आहे. या प्लांटचे काम सध्या पूर्णपणे बंद करण्यात आले असून, संबंधित प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
प्रभाग ८ मधील रहिवासी परिसरात आरएमसी प्लांट उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, असा प्रकल्प लोकवस्तीत झाल्यास धुळीचे प्रदूषण वाढून नागरिकांच्या आरोग्यावर, विशेषतः श्वसनाचे विकार जडण्याची भीती होती. तसेच पर्यावरणाचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांनी याला विरोध दर्शवला होता.

या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून भाजप नगरसेवक तथा अकलूज शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष महेश शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रशासनाकडे धाव घेतली:अकलूज नगर परिषद, तहसीलदार, प्रांत अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) सोलापूर येथील उपप्रादेशिक अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या बेकायदेशीर कामावर तात्काळ कारवाईची मागणी केली.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हलली. नगरपरिषद, MPCB आणि संबंधित प्लांटच्या इंजिनिअर्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या प्लांटचे काम थांबवण्यात आले असून तो अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
“नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. लोकवस्तीत अशा प्रदूषकारी प्रकल्पांना आमचा कायम विरोध राहील. भविष्यात पुन्हा त्या ठिकाणी प्लांट उभारण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.”— महेश शिंदे (नगरसेवक, भाजप)
प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून संवेदनशील भूमिका घेतल्याबद्दल आणि महेश शिंदे यांच्या प्रभावी पाठपुराव्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



