सफाळ्यातील रस्ते विकासाला मिळणार गती; १६५ कोटींच्या प्रकल्पाचे आमदार विलास तरे यांच्या हस्ते भूमिपूजन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे व परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रस्ते विकास प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली असून सफाळे पारगाव पोलीस चौकी ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरील हॅम अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार विलास तरे यांच्या हस्ते माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रकल्पामुळे दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि दर्जेदार होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
झाई–बोर्डी–तारापूर–परनाळी–सफाळे–पारगाव–वरई या राज्य मार्ग क्र. ८ च्या सुधारणेचा व्यापक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. किमी 20/000 ते 101/100 तसेच सफाळे–टेंभी–खोडावे (प्रतिमा 38) मार्गावरील किमी 0/000 ते 9/100 असा एकूण सुमारे 90.20 कि.मी. लांबीचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील संपर्क अधिक सुकर होऊन उद्योग, शेती, पर्यटन आणि दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे.
या कामासाठी एम/एस एस. बी. देशमुख या कंत्राटदार संस्थेला सुमारे 165 कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत 26 कि.मी. नवीन रस्ता बांधकाम, 22 कि.मी. रस्त्याचे नूतनीकरण आणि 5 कि.मी. रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय 68 मोऱ्यांचे बांधकाम, 4 स्लॅब कल्व्हर्ट, 5 ठिकाणी लहान पुलांचे नवीन बांधकाम, 5 ठिकाणी मोठ्या पुलांची दुरुस्ती, 61 चौकांची सुधारणा आणि 15 आधुनिक बस स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे.
रस्ता 7 मीटर रुंदीचा असून दोन्ही बाजूंनी 1.5 मीटर साईड पट्टी देण्यात येणार आहे. जुने पूल 2 फूटांनी उंचावून त्यांची रुंदी 12 मीटर करण्यात येणार असून दोन्ही बाजूंना 1 मीटर फुटपाथची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी सुरक्षिततेची हमी मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अपघातांचे प्रमाण घटेल आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित व जलद प्रवासाची सुविधा मिळेल. स्थानिक बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा आणि शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे.आमदार विलास तरे म्हणाले, “सफाळे व परिसरातील नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालघर जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच गती मिळेल.” उपस्थितांनीही हा प्रकल्प स्थानिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमास शाखा अभियंता संदीप राऊत, ग्रामपंचायत सदस्या स्पना समीर म्हात्रे, माधव पाटील, कर्दळचे सरपंच प्रथमेश भोईर, पारगावचे सरपंच अंकूश जाधव, मांडेचे सरपंच महेंद्र पाटील तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



