महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास; सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री!

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक ऐतिहासिक अध्याय लिहिला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या नियुक्तीसह त्या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहे.
राजभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष आणि छोटेखानी सोहळ्यात राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. शपथविधी दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘अजित दादा अमर रहे’ अशा घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेते पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबत चर्चा रंगल्या होत्या. मात्र, पक्षाने सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले, त्यानंतर त्यांची एकमताने निवड करण्यात आली.
कोण आहेत सुनेत्रा पवार? (थोडक्यात परिचय)
सुनेत्रा पवार यांचा प्रवास समाजकारणातून आता थेट राज्याच्या सर्वोच्च सत्तेपर्यंत पोहोचला आहे. त्यांचा परिचय खालीलप्रमाणे:
जन्म १८ ऑक्टोबर १९६३, धाराशिव (मराठवाडा)
कौटुंबिक पार्श्वभूमी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी
वैवाहिक प्रवास १९८० मध्ये अजित पवार यांच्याशी विवाह
सामाजिक कार्य बारामतीमधील कृषी आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान
राजकीय प्रवास २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली; त्यानंतर राज्यसभेवर निवड
सुनेत्रा पवार यांना राजकारणाचे बाळकडू माहेरूनच मिळाले होते. लग्न झाल्यानंतर अनेक वर्षे त्यांनी पडद्यामागून अजित पवारांना खंबीर साथ दिली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यानंतर प्रफुल पटेल यांच्या रिक्त जागी त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली होती. आता थेट उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळून त्या राज्याच्या विकासात आपली नवी भूमिका बजावतील.



