क्राईम

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगार अवधूत शेंडगेवर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई, रवानगी येरवडा कारागृहात.

वेळापूरचा सराईत गुन्हेगार अवधूत शेंडगे जेरबंद; ‘एमपीडीए’चा दणका देत रवानगी येरवडा जेलमध्ये!”

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

​सोलापूर: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील वेळापूर येथील सराईत गुन्हेगार अवधूत नारायण शेंडगे (रा. पिसेवाडी, ता. माळशिरस) याच्याविरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या आदेशानुसार, शेंडगे याला एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

​अवधूत शेंडगे हा वेळापूर आणि अकलूज पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर एकूण ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने खालील गुन्ह्यांचा समावेश आहे:

​खुनाचा प्रयत्न करणे.

​खंडणी मागणे आणि अवैध सावकारी.

​घातक हत्यारांचा वापर करून गंभीर दुखापत करणे.

​विनापरवाना हत्यार बाळगणे.

​पोलिसांनी यापूर्वीही त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली होती, मात्र त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा येत होती.

​पोलीस अधीक्षक श्री. अतुल वि. कुलकर्णी यांनी दिलेल्या आदेशानुसार, वेळापूर पोलीस ठाण्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शेंडगे याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले.

​या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, सोलापूर ग्रामीण हद्दीतील वाळूतस्करी, शरीरविषयक गुन्हे आणि अवैध दारू विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचे अभिलेख तयार केले जात आहेत. आगामी काळात अशाच प्रकारची कठोर कारवाई इतर गुन्हेगारांवरही केली जाईल.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि अपर जिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी आणि वेळापूर पोलीस स्टेशनच्या पथकाचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button