शहर

पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनारी घोडागाडीचा कहर : १२ वर्षीय जान्हवी पाटील गंभीर जखमी…..केळवा सागरी पोलीस आरोपीच्या शोधात

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीनिमित्त महिलांसोबत पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनारी मौजमजा करण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीच्या अंगावरून भरधाव घोडागाडी (टांगा) गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे . या आरोपीचा केळवा सागरी पोलीस कसून शोध घेत आहेत.या भीषण अपघातात जान्हवी पाटील (वय १२, रा. पालघर) हिला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रजासत्ताक दिनाची सुट्टी व केळवे महोत्सवामुळे सोमवारी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. जान्हवी आपल्या इमारतीतील महिलांसह समुद्र किनाऱ्यावर आली होती. आईकडे लहान बाळ असल्याने त्या बाजूलाच थांबल्या होत्या, तर जान्हवी व तिच्या मैत्रिणी समुद्राच्या पाण्याजवळ खेळत होत्या. दुपारी साडेचारच्या सुमारास पर्यटकांना घोडागाडी सफर करून देणारा एक टांगा भरधाव वेगाने किनाऱ्याच्या दिशेने आला. बेसावध अवस्थेत असलेल्या जान्हवीला टांग्याने जोरदार धडक दिली. धडकेनंतर टांग्याचे चाक थेट तिच्या पोटावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.

अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला. लाईफगार्ड व स्थानिक दुकानदारांनी तातडीने रिक्षातून तिला पालघर येथे हलवले. सिटी स्कॅननंतर तिच्या यकृत व मूत्रपिंडाला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला प्रथम मीरा रोड व त्यानंतर अंधेरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यकृतातून रक्तस्त्राव, रक्त साठणे व मूत्रपिंडाला गंभीर इजा झाल्याने तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

अपघातावेळी समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड गर्दी असतानाही बहुसंख्य पर्यटक बाहेरगावचे असल्याने कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे सरसावले नाही. विशेष म्हणजे संबंधित घोडागाडी चालक व इतर व्यावसायिकांनीही घटनेची माहिती पोलिसांना देण्याचे टाळल्याचे समोर आले आहे.

जान्हवीचे वडील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून अपघाताच्या वेळी ते उपस्थित नव्हते. मात्र जान्हवीच्या डोळ्याला व इतर अवयवांनाही दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र सागरी मंडळाने पर्यटनाला चालना देण्यासाठी केळवे किनाऱ्यावर बीच बाईक, सागरी नौकानयन, घोडागाडी व उंट सफर यांना परवानगी दिली होती. मात्र अनेक व्यावसायिकांनी परवान्याचे नूतनीकरण न केल्याची माहिती या घटनेतून पुढे आली आहे. गर्दीच्या ठिकाणी बेदरकारपणे व अतिवेगाने बीच बाईक व टांगे चालवले जात असल्याने यापूर्वीही लहान-मोठे अपघात घडले होते.

सध्या केळवे समुद्रकिनाऱ्यावर मोठया प्रमाणात घोडागाड्या व बीच बाईक सुरू असल्याने पर्यटकांना झटपट सफर करून पुन्हा नवीन ग्राहक मिळवण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेमुळे अति वेगाने वाहने चालवली जात असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या गंभीर अपघाताच्या पार्श्वभूमीवर केळवे सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी घोडागाडी, उंट सफर व बीच बाईक तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला असून आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी केळवा सागरी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत अशी माहिती टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्कला दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button