MPSC संयुक्त पूर्व परीक्षा २०२५: वयोमर्यादेबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ च्या संदर्भात राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांसमोर वयोमर्यादेचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.
गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून राज्यातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी वयोमर्यादेत सवलत मिळावी यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. कोरोना काळ आणि परीक्षांच्या वेळापत्रकात झालेला विलंब यामुळे अनेक विद्यार्थ्यांची परीक्षेची शेवटची संधी हुकण्याची भीती निर्माण झाली आहे. वारंवार विनंती करूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण आहे.

विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नाची दखल घेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे की:
हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य या निर्णयावर अवलंबून आहे.
विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून शांततेच्या मार्गाने आपला लढा सुरू ठेवला आहे.शासनाने विद्यार्थी हिताचा विचार करून वयोमर्यादेबाबत तात्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे.
राजकीय स्तरावरून या विषयाला पाठबळ मिळाल्याने आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “आम्ही रात्रंदिवस अभ्यास करतोय, पण वयोमर्यादेच्या तांत्रिक अडचणीमुळे आमची स्वप्ने धुळीस मिळण्याची भीती आहे. खासदारांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे,” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.



