पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवर “महार वतन” जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप…

🎯 विरोधक अजित पवारांचा राजीनामा घ्यायच्या तयारीत…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे संचालक असलेल्या ‘अमीडीया होल्डिंग्स एलएलपी’ या कंपनीवर पुण्यातील कोट्यवधी रुपयांच्या जमीन खरेदी प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा आरोप करत,सुमारे १८०० कोटी रुपये बाजारभाव असलेली ‘महार वतनाची’ जमीन कंपनीने अवघ्या ३०० कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा दावा केला आहे…
या कथित गैरव्यवहारामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांच्या निशाण्यावर अजित पवार आले असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध पवित्रा घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे…
आरोपांचे स्वरूप आणि मुख्य मुद्दे,जमिनीचा प्रकार आणि किंमत
अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपानुसार,पुण्यातील कोरेगाव पार्क/मुंढवा परिसरातील सुमारे ४० एकर ‘महार वतनाची’ जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केली आहे.या जमिनीचा बाजारभाव अंदाजे १८०० कोटी रुपये असताना,ती केवळ ३०० कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली आहे…
मुद्रांक शुल्क माफीचा दावा
सर्वात गंभीर बाब म्हणजे,या व्यवहारानंतर अवघ्या ४८ तासांत या प्रकल्पावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.या व्यवहारावर अपेक्षित असलेले सुमारे २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क केवळ ५०० रुपये भरून चुकवण्यात आले,असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे…
‘महार वतन’ जमिनीचा मुद्दा
‘महार वतन’ जमीन ही ऐतिहासिक आणि कायदेशीर महत्त्व असलेली जमीन आहे.बॉम्बे इन्फेरियर व्हिलेज वतन निर्मूलन कायदा,१९५८ नुसार,सरकारी परवानगीशिवाय या जमिनीची विक्री किंवा हस्तांतरण करता येत नाही.त्यामुळे सरकारी नियमांना डावलून हा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात येत आहे…
मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
या आरोपांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.हे प्रकरण प्रथमदर्शनी गंभीर दिसत असून,अनियमितता आढळल्यास निश्चितपणे कारवाई केली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले आहे.महसूल विभाग,आयजीआर आणि भूमी अभिलेख विभागाकडून सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे…
या प्रकरणी महसूल विभागाने एका दुय्यम निबंधकाचे (Sub-Registrar) निलंबन केले असून,अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे…
शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांच्यासह उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणा वरून सरकारवर आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून यांचे बंगले शेतकऱ्यांच्या उरावर बांधतात,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे…
पार्थ पवार/अजित पवार यांची भूमिका – या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्याप थेट प्रतिक्रिया दिलेली नाही.मात्र संबंधित प्रकरणाशी आपला थेट संबंध नसल्याचे ते म्हणाले आहेत आणि चौकशीअंती सत्य बाहेर येईल,असे हि संकेत त्यांनी दिले आहेत…



