ठाकरे सेनेची “मुलुख मैदानी तोफ” काही महिन्यांसाठी थंडावली…

🎯 संजय राऊत यांना गंभीर आजाराची लागण… सूत्रांची माहिती
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार आणि पक्षाचे मुखपत्र ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी अचानक सार्वजनिक जीवनातून काही महिन्यांसाठी विश्रांती घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.आपल्या धारदार वक्तृत्वाने आणि आक्रमक भूमिकेने विरोधकांना धारेवर धरणारे राऊत यांनी प्रकृतीत ‘गंभीर स्वरूपाचे बिघाड’ झाल्याचे सांगत,उपचार घेत असल्याचे स्पष्ट केले आहे…
संजय राऊत यांनी समाजमाध्यमांवर एक भावनिक पत्रक प्रसिद्ध करून आपल्या मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांना ही माहिती दिली.त्यांनी नमूद केले आहे की,त्यांच्या प्रकृतीत अचानक गंभीर बिघाड झाल्याने डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.वैद्यकीय सल्ल्यानुसार,त्यांना पुढील काही महिने बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत…
राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे कि,”आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले,पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याचे समोर आले.उपचार सुरू आहेत,मी यातून लवकरच बाहेर पडेन.वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.त्यास नाईलाज आहे.मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन.”
राऊत यांनी नेमका कोणता आजार आहे,हे स्पष्ट केले नसले तरी,काही वर्षांपूर्वी (२०१९ आणि २०२० मध्ये) त्यांच्यावर हृदयविकाराच्या संबंधित दोन वेळा “अँजिओप्लास्टी” करण्यात आल्या होत्या.काही दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते.कदाचित,अति ताण आणि सातत्याच्या राजकीय व्यस्ततेमुळे जुन्या आरोग्याच्या समस्या पुन्हा वाढल्या असाव्यात,असा कयास लावला जात आहे…
राजकीय वर्तुळातून मात्र त्यांच्यावर सदिच्छाचा वर्षाव
संजय राऊत यांच्या या घोषणेनंतर देशभरातील राजकीय नेत्यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील (ट्विटर) वर पोस्ट करून राऊत यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे…
ठाकरे गटासाठी मोठा धक्का
मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि इतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी तोंडावर असताना,संजय राऊत यांचा सार्वजनिक जीवनातून दूर राहण्याचा निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.राऊत हे पक्षाची “मुलुख मैदानी तोफ” म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा विरोधी पक्षावर टीका करण्यासाठी तसेच पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.त्यांचा तात्पुरता विरह निश्चितच पक्षाच्या संचार धोरणावर परिणाम करेल…
आपल्या प्रकृतीवर लक्ष केंद्रित करून लवकर बरे होण्यासाठी त्यांनी घेतलेला हा ब्रेक त्यांच्या हितचिंतकांना थोडा दिलासा देणारा आहे.राजकीय आखाड्यातून काही काळ दूर राहून,संजय राऊत लवकरच नव्या उत्साहाने आणि जोमाने परततील नव्या वर्षात “धडाकेबाज” पदार्पण करतील अशी अपेक्षा त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक करत आहेत…



