सफाळे येथील गणेश ज्वेलर्स यांनी केली ग्राहकांशी 420 गिरी… करोडो रुपयांचे सोने आणि रोख रक्कम घेऊन ज्वेलर्स फरार

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत.
पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील गणेश ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानाचा मालकाने सफाळे येथील 33 ग्राहकांचे 65 तोळे सोने आणि 33 लाख रुपये रोख रक्कम घेऊन फरार झाला आहे. याबाबत या सर्व ग्राहकांनी सफाळे पोलीस ठाण्यात या गणेश ज्वेलर्स दुकानाच्या दोन भागीदारांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली आहे.
सफाळे पूर्व रेल्वे फटका शेजारी गेल्या अनेक वर्षापासून कान्हाराम दलाराम चौधरी व हितेश ढोलकिया या दोन भागीदारांचे गणेश ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान आहे. सफाळे भागातील या दुकानात सफाळे उंबरपाडा येथील अश्विनी विकी देशमुख, विराथन बुद्रुक येथील गुलाब काशिनाथ किणी, दत्तात्रेय पाटील ,चेतन किनी अशा अनेक ग्राहकांनी आपले जुने सोने देऊन नवीन दागिने बनवण्यासाठी रोख रक्कम या दुकानदाराकडे जमा केली होती. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून हा दुकानदार या 33 ग्राहकांची फसवणूक करत होता.
अखेर या दुकानदारांनी काही दिवसाआधी आपल्या दुकानाला टाळे ठोकून 65 तोळे जुने नवे सोने यासह ग्राहकांनी जमा केलेली 33 लाखाची रोख रक्कम घेऊन हा दुकानदार अनेक दिवसापासून फरार झाला आहे. याबाबत या सर्व ग्राहकांनी सफाळे पोलीस ठाण्यात गणेश ज्वेलर्स आणि या दुकानाचे दोन मालक यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार केली असून सफाळे पोलीस या दोघांचा कसून शोध घेत आहेत.



