यशवंतराव चाफेकर कॉलेज पालघर येथे 22 जुलै रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन… युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभर २०२५-२६ या आर्थिक वर्षात १००० रोजगार मेळावे आयोजित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातही यंदा अंदाजे २० रोजगार मेळावे घेण्यात येणार असून, पहिला मेळावा २२ जुलै २०२५ रोजी यशवंतराव चाफेकर कॉलेज, पालघर येथे पार पडणार आहे.
या रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर व यशवंतराव चाफेकर कॉलेज, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील तरुणांना विविध खाजगी कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर खाजगी कंपन्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर त्यांच्या रिक्त पदांची नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी 02525-299812 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून प्रशिक्षणासोबत विद्यावेतन
बेरोजगार तरुणांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” राज्यभर राबवली जात आहे. या योजनेंतर्गत खाजगी आस्थापनांमध्ये रुजू होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना ११ महिन्यांचे ऑन-जॉब प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार DBT (थेट लाभ हस्तांतरण) पद्धतीने खालीलप्रमाणे विद्यावेतन दिले जाते :
१२वी उत्तीर्ण – ₹6,000 प्रतिमाह
ITI / डिप्लोमा – ₹8,000 प्रतिमाह
पदवीधर – ₹10,000 प्रतिमाह
यासाठी इच्छुक तरुणांनी तसेच खाजगी आस्थापनांनी www.cmykpy.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
रेणुका तम्मलवार यांनी युवक-युवतींना आवाहन केले आहे की, रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी बायोडेटाच्या ५ छायांकित प्रतींसह मेळाव्याला उपस्थित राहावे व विविध संधींचा लाभ घ्यावा.



