“स्व. हिराजी पाटील प्रतिष्ठान” आणि बहुजन विकास आघाडी तर्फे जिल्हाधिकारी पालघर यांना विविध मागण्यांबाबत निवेदन.

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
“आदिवासी समाजसेवक स्व. हिराजी पाटील प्रतिष्ठान” चे अध्यक्ष व बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार राजेश पाटील यांनी प्रतिष्ठान व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवार दिनांक 11 जुलै रोजी पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी इंदू राणी जाखड यांची भेट घेऊन जिल्ह्यातील विविध गंभीर समस्या मांडल्या.
या भेटीत प्रमुख मुद्दा म्हणून संपूर्ण पालघर जिल्ह्यातील वनदावेदारांना आलेल्या ना-मंजुरी नोटिसी संदर्भात चर्चा करण्यात आली सदर नोटीसींमध्ये वनदाव्याचे अपील “कोकण भवन” येथे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, आदिवासी दावेदारांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेता, माजी आमदार राजेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली की वनदाव्याचे अपील अर्ज पालघर जिल्ह्यातच स्वीकारण्यात यावेत व सुनावणीही याठिकाणीच पार पडावी.
तसेच जिल्ह्यातील बस डेपो, रेल्वे स्टेशन, सरकारी दवाखाने व सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था याबाबतही निवेदन सादर करण्यात आले. या सुविधांची तातडीने दुरुस्ती करून सामान्य जनतेसाठी स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रतिष्ठानकडून करण्यात आली.

“जल जीवन मिशन” व “महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP)” अंतर्गत सुरू असलेल्या अपूर्ण योजनांबाबतही चर्चा झाली. या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक उपाययोजना व धोरणात्मक निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले.
त्याचप्रमाणे, PMGYS आणि MMGSY अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, तसेच खुटल आश्रमशाळेच्या आवारातील अतिक्रमणाच्या प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस माजी पंचायत समिती सदस्य प्रविण सातवी, जेष्ठ कार्यकर्ते अशोक पाटील, बिरवाडीचे सरपंच विनोद भावर, प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष दिलीप हरवटे, उपाध्यक्ष शनिवार भीमरा, तालुका अध्यक्ष सुनील तलेकर, सल्लागार दिगंबर पाटील, सचिव रुपेश भोईर, सदस्य किरण गरुडा आणि सोनीराम पागी आदी मान्यवर उपस्थित होते.
या सर्व विषयांवर जिल्हाधिकारी मा. इंदू राणी जाखड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रत्येक विषयात जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.



