प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भटक्या-विमुक्त जाती-जमातींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवू नका; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभा करू – महेश शिंदे

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज, ता. माळशिरस:”भटक्या आणि विमुक्त जाती-जमातींना शासनाने वेळोवेळी दिलेल्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. यापुढे जर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभं केलं जाईल,” असा इशारा भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि गोंधळी समाज सेवा विकास महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष महेश केशव शिंदे यांनी दिला आहे. भटक्या-विमुक्तांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून या समाजाच्या हक्कांसाठी झगडत आहेत.
महेश शिंदे म्हणाले, “भटक्या-विमुक्त समाजातील लाखो लोक आजही आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, व सर्वात महत्त्वाचे म्हणजे जातीचा दाखला यांसारख्या मूलभूत कागदपत्रांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांना शिक्षण, आरोग्य, आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.”
“राज्य शासनाने वेळोवेळी या समाजासाठी धोरणात्मक निर्णय घेतले असले, तरी स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ते प्रत्यक्ष अंमलात येताना दिसत नाहीत. ही स्थिती बदलणे आवश्यक आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनांद्वारे सातत्याने जागे करत आहोत, पण अजूनही दुर्लक्ष सुरू आहे,” असेही ते म्हणाले.
“भटक्या-विमुक्त समाज हा देशाच्या आर्थिक, सामाजिक, व सांस्कृतिक विकासाचा अविभाज्य घटक आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा राज्यभर रस्त्यावर उतरून लढा देण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा स्पष्ट इशारा महेश शिंदे यांनी दिला.



