वैष्णवी कस्पटे हगवणे मृत्यू प्रकरणा नंतर अवघ्या महाराष्ट्राला गरज आहे ती आत्म परीक्षेची…!

🎯 हुंडाबळीची शिकार ठरलेल्या वैष्णवीला टाइम्स 9 कडून भावपुर्ण श्रध्दांजली…
आमीर मोहोळकर टाइम्स 9 न्यूज,अकलूज
हा आठवडा महाराष्ट्रासाठी कायम स्मरणात राहील कारण याच आठवड्यात देवेंद्र फडणवीस सरकारने ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्री पदाची शपथ देत मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आवाहन देण्याचा प्रयत्न केला…
तसेच याच आठवड्यात मे महिन्याच्या मध्याला हवामान खात्या सह पंजाबराव डख यांनी वर्तवलेले अवकाळी पावसाचे सावट महाराष्ट्रामध्ये दाखल झाले आणि ते सावट काय कमी होण्याचे चित्र अजून तरी निर्माण झालेले पहायला मिळाले नाही,या वर्षी मान्सून जणू काय महाराष्ट्रातून केरळला जाणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली पहायला मिळत आहे…असो…
महाराष्ट्रामध्ये याच आठवड्यात एक घटना अशी हि घडली की,त्या घटनेने अनेक जणांच्या भुवया मात्र उंचावल्या आणि त्याच घटनेचा आढावा आज आपण टाइम्स 9 च्या माध्यमातून घेणार आहोत…
तर ती घटना अशी की,प्रेम विवाह केलेल्या एका विवाहित महिलेने संपवलेले आपले जीवन,होय वैष्णवी कस्पटे हगवणे असे नाव असलेली एक महिला हुंडाबळीची शिकार झाली,महाराष्ट्रामध्ये हुंडाबळीची शिकार झालेली वैष्णवी हि काय पहिली महिला नव्हतीच…
जवळ जवळ पन्नास लाखाचे सोने,दहा लाखाची चांदी,चाळीस लाखाची फोरचूनर गाडी आणि लग्न सोहळ्याचा पन्नास लाख रुपये खर्च करून मोठ्या घराण्यातला मुलगा त्या वधू पित्याने विकत घेऊन देखील अखेर त्या जावयाने आपली जात दाखवलीच…
हुंडाबळी ची घटना महाराष्ट्रासाठी नवीन जरी नसली तरी सुद्धा आपला मुलगा विकला गेला आहे हे माहित असुन देखील शेती साठी आणि उद्योग धंद्यासाठी वधू पित्याकडे पैशाची मागणी करणे हे कितपत योग्य आहे हे ठरवायची वेळ आलेली आहे…
आपल्या मुलीच्या सुखी जीवनाला प्रत्येक आई आणि वडिलांच्या नेहमी शुभेच्छाच असतात परंतु अशा प्रकारे जावई विकत घेऊन आपली मुलगी खुशाल राहील याची गॅरंटी आजच्या जमान्यात तर राहिली नाही हे मात्र अधोरेखित झाले…
त्या वधू पित्याने “छोकरी” हि द्यायचे आणि “नोकरी” हि द्यायचे मग त्या मृत महिलेच्या पतीला “कर्तृत्ववान” कसे म्हणायचे…? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो,नऊ महिन्याचे बाळ मागे सोडून गेलेली ती वैष्णवी आज जगात नाहीय हे सत्य मात्र तिच्या माहेरच्या लोकांना कसे पचनी पडत असेल देव जाणो…
आता ती वेळ आलेली आहे,बाप म्हणून आपण मुली शिकवल्या त्यांना या आधुनिक जगाचे सर्व ज्ञान आपण दिले,आता गरज आहे ती आपल्याच आत्म परीक्षेची आणि त्या आत्म परीक्षेची नुसत्या त्या वधू पित्याने बसून चालणार नाही तर सर्व समाज घटकाने याची दखल घेणे महत्वाचे ठरणार आहे,हे मात्र तितकेच खरे…



