शहर

सोलापूर चे प्रख्यात डॉ शिरीष वळसंगकर यांचे निधन…

🎯 डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या एका दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेत शहरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ.शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न करत स्वतःवर गोळ्या झाडल्या. या गंभीर घटनेनंतर त्यांना तात्काळ त्यांच्या रामवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.या घटनेनं सोलापूर शहरासह वैद्यकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

घटनेचा तपशील :
प्राथमिक माहितीनुसार,डॉ. वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री सुमारे ८.३० वाजता राहत्या घरातील बेडरूममध्ये स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्वरमधून दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली. गोळी लागल्यानंतर त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी तत्काळ कृती करत त्यांना त्यांच्याच रुग्णालयात दाखल केलं. सायंकाळपासूनच शहरातील डॉक्टर्स,पोलीस अधिकारी, माध्यम प्रतिनिधी व नागरिक या रुग्णालयाबाहेर गर्दी करून होते.मात्र कोणीही अधिकृत वक्तव्य करायला तयार नव्हतं.

घटनास्थळावर पोलिसांची उपस्थिती :
घटनेची माहिती मिळताच पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली.डॉ. वळसंगकर यांच्या बेडरूममधील निरीक्षण करताना एक गोळी लागून काचेला तडा गेलेला असल्याचं निदर्शनास आलं.पोलीस विभागाकडून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू असून,आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

डॉ. वळसंगकर – वैद्यकीय सेवा आणि समाजकार्याचा वारसा :
डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात न्यूरोलॉजी क्षेत्रातील आदरणीय नाव मानलं जायचं. त्यांनी आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत हजारो रुग्णांना नवजीवन दिलं होतं. मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित विकारांवर अत्याधुनिक उपचार पद्धती राबवण्यात त्यांना दांडगा अनुभव होता. तसंच गरीब आणि गरजू रुग्णांसाठी अनेक वेळा विनामूल्य तपासण्या, शिबिरे आयोजित करत त्यांनी सामाजिक जबाबदारी जपली होती.

सामाजिक क्षेत्रातून दुःख व्यक्त :
डॉ. वळसंगकर यांच्या निधनाने सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. अनेक डॉक्टर, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या जाण्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. “रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा डॉक्टर आज अचानक स्वतःचं आयुष्य संपवून गेला, यावर विश्वास बसत नाही,” अशी भावना अनेक सहकारी डॉक्टरांनी व्यक्त केली.

पुढील तपास सुरू :
पोलीस याप्रकरणी त्यांच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत असून, त्यांच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी कोणतीही चिठ्ठी लिहिलेली आहे का, याचाही शोध सुरू आहे.

संपूर्ण शहरात शोकमग्न वातावरण :
एक गुणी डॉक्टर, समर्पित समाजसेवक आणि माणूस म्हणून डॉ. वळसंगकर हे सोलापूरकरांच्या हृदयात कायमचं स्थान मिळवून गेले होते. त्यांच्या अचानक जाण्याने सगळ्यांच्याच डोळ्यांत अश्रू आले आहेत. सोलापूरच्या वैद्यकीय इतिहासात ही घटना एक काळी छाया बनून राहणार आहे.

सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून धक्कादायक बातमी समोर आली,सोलापूरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी…

आत्म्हत्येतेचे कारण अजून समजले नसुन सोलापूर पोलिस संबंधित घटनेचा तपास करत असल्याची माहिती टाइम्स 9 न्यूज च्या सुत्रांनी दिली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button