शहर

कोळी मल्हार समाजाच्या अस्मितेचा जागर…… पालघर सातिवली येथे 6 वे राज्यव्यापी संमेलन उत्साहात संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

कोळी मल्हार समाजाच्या एकतेचा, संस्कृतीचा आणि अस्मितेचा जागर करणारे 6 वे कोळी मल्हार राज्यव्यापी संमेलन पालघर तालुक्यातील सातिवली येथे रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात पार पडले. माजी आमदार महादेव घाटाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाची सुरुवात पारंपरिक वाद्य आणि नृत्यांच्या गजरात मान्यवरांचे स्वागत करून झाली.

संमेलनात विविध जिल्ह्यांतून आलेले कोळी मल्हार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार विलास तरे, माजी आमदार राजेश पाटील, मोहन गुहे, राजेश तारवी, तुकाराम माळी, ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशनचे पालघर जिल्हाध्यक्ष, कार्यकर्ते विलास बेलकर यांचा समावेश होता.

यावेळी कोळी मल्हार समाजाच्या सद्यस्थितीवर, भविष्यातील दिशा आणि समाजासमोरील आव्हानांवर चर्चा करण्यात आली. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजाच्या संघटित बांधणीची गरज अधोरेखित करण्यात आली.

अध्यक्ष महादेव घाटाळ म्हणाले, “कोळी मल्हार समाज एक आहे, हे दाखवण्यासाठी असे संमेलने अत्यंत गरजेचे आहेत. आपल्या देवी-देवतांची माहिती, बोलीभाषा, जात प्रमाणपत्रे आणि सांस्कृतिक ठेवा यांचे दस्तावेजीकरण करणे काळाची गरज आहे. राज्यस्तरीय समितीची स्थापना करून समाजहितासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.”

आमदार विलास तरे यांनी सांगितले की, “अस्मिता आणि संस्कृती जागवणारी अशी संमेलने समाजाला दिशा देतात. तरुण पिढीने या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणे गरजेचे आहे.”

माजी आमदार राजेश पाटील यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “‘मल्हार कोळी’ नव्हे तर ‘कोळी मल्हार’ या नावानेच समाजाची ओळख प्रस्थापित झाली पाहिजे. समाजाची लोकसंख्या तीन लाखांहून अधिक असून, त्याचे अस्तित्व रेकॉर्डवर यायला हवे. वाद्यसंस्कृती, बोलीभाषा, गीतांचा संग्रह आणि देवदेवतांचा सांस्कृतिक ठेवा जतन करणे महत्त्वाचे आहे. वर्गणीचा हिशोब पारदर्शक असावा व आर्थिक शिस्तीचा आदर्श निर्माण करावा.”

सुनील झळके यांनी कोळी मल्हार समाजाच्या संस्कृतीवर आधारित ग्रंथ तयार करण्याची संकल्पना मांडली, तर अंकुश देसले यांनी संस्कृती आणि समाजविषयक माहितीपूर्ण मार्गदर्शन केले.

संमेलनात मोहन गुहे, अरुण कदम, संजय भुयाळ, सीताराम माळी, चंद्रकांत घाटाळ, रमेश कुंभारे, स्नेहलता सातवी, सुनंदा बेलकर, नीता काटकर, राजश्री पाटील, विष्णू जाधव, दिनेश तारवी, तुकाराम घाटाळ, अनंत घाटाळ, अभिजीत पिलेना, प्रदीप तारवी, गुरुनाथ लहांगे, प्रशांत सातवी, रामू भोईर, गणेश बोंबाडे, निलेश कासट, माधव तल्हा, कृष्णा वारंगडे, नितीन बोंबाडे, अंनता पुंजारा, सुधीर भोईर, सीताराम माळी, गंगाराम वारंगडे, गुरुनाथ लहानगे, प्रकाश वरखंडा, राजू दळवी, कृष्णा जाधव, रामदास हरवटे, अविनाश मातेरा, सुनील गायकवाड, शिवाजी भोवरे, रज्जू सातवी, आदी मान्यवर उपस्थित होते.

हे संमेलन कोळी मल्हार समाजाच्या एकतेचे आणि सांस्कृतिक जाणीवांचे प्रतीक ठरले असून, भविष्यातील वाटचालीस निश्चितच नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button