शहर

सफाळे नवीन उड्डाणपूल सुरू.. पण पायी प्रवास करणाऱ्यांचे काय  ?लोकप्रतिनिधी लक्ष देणार का ?

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

सफाळे पूर्व-पश्चिम भागातील वाहन वाहतुकीसाठी निसर्गवासी काळुराम काका दोधडे उड्डाणपूल सुरू करण्यात आला आहे. चारचाकी, तिनचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी हा पूल मोठा लाभदायक ठरणार असला तरी पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

सफाळे पूर्व भागात बाजारपेठ, शाळा, सरकारी कार्यालये आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. याठिकाणी दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी पायी प्रवास करतात. मात्र, नव्या उड्डाणपुलाच्या सुरू होण्याबरोबरच सफाळे रेल्वे गेट नंबर 40 कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.

पूर्वी नागरिक सहजपणे रेल्वे फाटक ओलांडून आपल्या कामांसाठी जाऊ शकत होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने कोणताही पादचारी पूल (फुटब्रिज) उपलब्ध न करता फाटक बंद केल्याने गोरगरीब नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी आणि वृद्धांसाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. नवीन उड्डाणपूल किंवा कपासे उड्डाणपूल हे फक्त वाहनांसाठीच सोयीचे असून पायी प्रवास करणाऱ्यांसाठी ते अडचणीचे ठरत आहे. विशेषतः आजारी व्यक्ती, महिला, विद्यार्थ्यांना किंवा हातात सामान असलेल्या नागरिकांना या पुलावरून प्रवास करणे अवघड आहे. शिवाय, तीनचाकी वाहनांचा वापर हा आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही.

यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे संभाव्य जनक्षोभ टाळण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्वरित या समस्येकडे लक्ष द्यावे. सफाळे पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर त्वरित एक फुटब्रिज उभारण्यात यावा अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे. यामुळे नागरिकांचा त्रास आणि वेळ वाचेल  तसेच सुरक्षित प्रवास शक्य होईल. लोकप्रतिनिधींनी या मागणीची त्वरित दखल घ्यावी अशी जनतेची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button