वसई तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
वसई तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, भाताणे (बेलवाडी) येथे सर्वदा प्रतिष्ठान आणि आदिवासी समाजसेवक स्व. हिराजी पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम व नेतृत्व या विषयांवर आधारित चित्रे साकारली. तसेच, विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषणे देऊन महाराजांच्या विचारांना उजाळा दिला. काही विद्यार्थ्यांनी महाराजांचे प्रेरणादायी विचार मांडले, तर काहींनी लेझीम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे शिवचरित्राचे प्रभावी सादरीकरण केले.

या कार्यक्रमास माजी आमदार राजेश पाटील, माजी पंचायत समिती सभापती अशोक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रणय कासार, ग्रामपंचायत सदस्य मंगल भोया, डॉ. राजश्री राजेश पाटील, तसेच शाळेतील शिक्षकवृंद आणि मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी शिवरायांचे विचार आणि आदर्श आजच्या तरुण पिढीने आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेच्या व्यवस्थापनाने विशेष परिश्रम घेतले.



