शेत रस्त्यासाठी भांडण काढून मारहाणीचा गुन्हा दाखल असलेल्यांवर कारवाई ऐवजी आरोपीचे नाव काढून टाकण्यासाठी तपास अधिकाऱ्याचा फिर्यादीवर दबाव; फिर्यादीची पोलीस अधिक्षकांकडे धाव…

करमाळा, प्रतिनिधी आलीम शेख
- तालुक्यातील सातोली येथे शेतरस्त्याच्या कारणावरून पिता-पुत्रास मारहाण केल्याप्रकरणी संतोष बिभीषण फरतडे यांनी दि.11/12/2023 रोजी 5 वाजता करमाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार केली होती. फरतडेंच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी ९ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र या आरोपींवर कोणतीही कारवाई न होता उलट गुन्ह्यातून आरोपीचे नाव कमी करण्याबाबत तपास अधिकाऱ्याकडून दमदाटी होत असल्याने सदर फिर्यादीने पोलिस अधीक्षक (सोलापुर ग्रामीण) यांच्याकडे दि.28/12/2023 रोजी अर्ज करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या अर्जात फरतडे यांनी म्हटले आहे की, सुहास रामचंद्र साळुंके, हनुमंत रंगनाथ साळुंके, नितीन हनुमंत साळुंके, योगेश हनुमंत साळुंके, दत्तात्रय नानासाहेब साळुंके, नानासाहेब रंगनाथ साळुंके, विश्वंभर सोपान साळुंके, वैभव विष्णु तळेकर, आण्णा बापू पवार (सर्व रा-सातोली) या सर्वांनी दि.9/12/2023 रोजी सकाळी 8.30 वाजता शेत रस्त्यासाठी भांडण काढून मारहाण केल्याप्रकरणी दि.11/12/2023 रोजी 5 वाजता करमाळा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. आजतागायत सदर आरोपींवर कुठलीही कारवाई झालेली नाही. याउलट तपास अधिकारी संजय जाधव यांनी सुहास रामचंद्र साळुंके त्यांचे मित्र आहेत, त्यांचे नांव काढून टाका असे म्हणून दमदाटी करत असल्याचे तसेच फिर्यादीवर खोटा गुन्हा दाखल करणार असल्याची धमकी दिली आहे.
तसेच सदर आरोपींवर कारवाई झाली नसल्याने पोलिस आमच्याबाजूने असल्याचे सांगून दहशत निर्माण करून जिवे मारण्याची धमकी देत असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फरतडे यांनी केली आहे.



