सफाळे येथील तरुणीची छेडछाड करून कपडे फाडणाऱ्या रोड रोमिओ विरुद्ध सफाळे सर्वपक्षीय कडकडीत बंदला सफाळे करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
सफाळे येथील एका स्थानिक तरुणीच्या विनयभंगाप्रकरणी सफाळ्यात मंगळवार 13 ऑगस्ट 2024 रोजी सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली होती.
या बंदला येथील व्यापाऱ्यांनी तसेच अन्य दुकानदारांनी 10 ते 05 या वेळेत आपली दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद करुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्थानिक पोलिस आणि रेल्वे पोलिसांनी अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने कोणताच अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडला.

गुरुवार 01 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सफाळे स्थानकाजवळील पार्किंगमध्ये एका तरुणीची छेड काढण्यात आली होती. याप्रकरणी पालघर लोहमार्ग पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती. मात्र त्यानंतर येथील सर्व पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आणि अन्य संघटनांनी रविवार 11 ऑगस्ट रोजी एक बैठक बोलावून या घटेबाबत गंभीर चर्चा केली.

दरम्यान, सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सर्वपक्षीयांनी एकत्रित येवून तमाम भगिनींच्या संरक्षणाबाबत येथील जनतेमध्ये एकजूट आहे, ही आम जनतेची भूमिका सर्व परिसरामध्ये जाहीर व्ह्यावी, तसेच अशी घटना पुन्हा होऊ नये, यासाठी मंगळवारी बंदची हाक पुकारली होती.

या बंदला व्यापारी तसेच अन्य दुकानदारांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती. यात शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये, दूध डेअरी, मेडिकल शॉप आदि अत्यावश्यक सोयी सुविधा सुरु ठेवण्यात आल्या होत्या. तर सफाळे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे आणि पालघर लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी सकाळपासूनच बाजारपेठ आणि स्थानकात कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.



